Advertisement

देवनार पशुवध गृहासाठी दुसऱ्यांदा प्रकल्प सल्लागार; ६.२५ कोटींचा खर्च


देवनार पशुवध गृहासाठी दुसऱ्यांदा प्रकल्प सल्लागार; ६.२५ कोटींचा खर्च
SHARES

महापालिकेच्या देवनार पशुवधगृह आधुनिकीकरणाच्या कामासाठी नेमलेल्या पहिल्या सल्लागाराने काढता पाय घेतल्यानंतर आता या कामासाठी दुसऱ्यांदा सल्लागाराची नेमणूक करण्यात येत आहे. महापालिका शालेय इमारत दुरुस्तीसाठी तसेच महापालिका इमारतींच्या दुरुस्तीसाठी नेमलेल्या सल्लागारांनी बाहेरील कंपन्यांशी संयुक्त भागीदारीत कंपनी बनवून देवनार पशुवधगृहाच्या आधुनिकीकरणाची जबाबदारी उचलली आहे. या सल्लागार सेवेसाठी ६.२५ कोटी रुपये मोजले जाणार आहेत.


आधीच्या सल्लागाराने केले २०% काम

देवनार पशुवधगृहाच्या आधुनिकीकरणाची कामे करण्यासाठी स्थायी समितीच्या मान्यतेने डिसेंबर २०१५मध्ये के. के. अॅण्ड असोसिएट्स यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासाठी या प्रकल्प सल्लागाराशी महापालिकेने लेखी करार करून त्यांना ८.०५ कोटींचे कंत्राट देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार के. के. अॅण्ड असोसिएट्स यांनी तपशीलवार प्रकल्प अहवाल सादर केला. हा अहवाल सादर करत २० टक्के काम या सल्लागाराने पूर्ण केले होते. परंतु निविदा मागवण्यासाठी आवश्यक तपशील व माहिती तसेच वस्तुनिष्ठ अंदाजपत्रक सादर न करता या प्रकल्प सल्लागाराने यातून माघार घेतली.


सल्लागाराला काळ्या यादीत टाकणार

माघार घेतलेल्या के. के. असोसिएट्सला २०टक्के कामांचे १.६१ कोटी रुपये आधीच देण्यात आले असून उर्वरीत कामांची रक्कम देणे बाकी आहे. परंतु, या सल्लागाराने असमर्थता दर्शवल्यामुळे त्यांचे बँक हमी पत्र वसूल करण्यात आले असून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत या सल्लागाराने उच्च न्यायालयात दावा दाखल केला असून त्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.


तीन सल्लागारांची संयुक्त भागीदारी

मात्र, या प्रकल्प सल्लागाराने बनवलेल्या अहवालावरच जोखीम नि खर्च करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी नगर अभियंता कार्यालय व महापालिका वास्तूविशारद कार्यालयाच्या सल्लागार सूचीतील सल्लागारांकडून निविदा मागवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार तीन सल्लागारांनी संयुक्त भागीदारीतील (जेव्ही)कंपनीसोबत निविदेत भाग घेतला. यामध्ये पेन्टॅकल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड आणि जी. के. सेन अॅण्ड असोसिएट्स ही कंपनी पात्र ठरली आहे.


कत्तलखाना दुरूस्तीच्याही पलिकडे

१९६९-७०च्या दरम्यान कत्तलखान्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या कत्तलखान्यातील बहुतांशी बांधकामे सुस्थितीत नसल्याने या बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने म्हशी, डुक्कर तसेच शेळ्या,मेंढ्यांसाठी असलेल्या कत्तलखान्यांची परिस्थिती चांगली नाही. या व्यतिरिक्त आवारात असलेले उपहारगृह, तसेच परवानाधारक व्यापाऱ्यांची कार्यालये व इतर बांधकामे धोकादायक परिस्थितीमध्ये असल्याने स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करणे योग्य नसल्याने ती बांधकामे पाडून हे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.


आकडेवारी काय सांगते?

देवनार पशुवधगृहाचे एकूण क्षेत्रफळ - ६४ एकर
शेळी व मेंढी पशुवधगृह - प्रति पाळी ६ हजार
म्हैस पशुवधगृह - प्रति पाळी ६००
डुक्कर पशुवधगृह - प्रति पाळी ३००
आधुनिकीकरणासाठी येणारा खर्च - ५०० ते ६०० कोटी रुपये



हेही वाचा

देवनार डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा आग! लावली की लागली?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा