Advertisement

काऊंटडाऊन सुरू, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज

सुट्टी घेत बऱ्यापैकी मुंबईकर बाहेर गेले असले तरी मुंबईतच न्यू इयर सेलिब्रेशन करण्याचं ठरवलेल्या मुंबईकरांना माॅल, पंचतारांकित हाॅटेल्स, चौपाट्या आणि टेरेस पार्ट्यांची निवड केली आहे. यंदा मुंबईकरांना क्रूझवर सेलिब्रेशन करण्याची सुवर्णसंधीही उपलब्ध झाली आहे ती आंग्रीया क्रूझच्या माध्यमातून.

काऊंटडाऊन सुरू, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज
SHARES

सरत्या २०१८ वर्षाला निरोप देण्यासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. पंचतारांकित हाॅटेलांपासून इमारती-इमारतीवरील टेरेसही पार्ट्यांसाठी तयार झाल्या आहेत. मुंबई आणि नववर्षाचं स्वागत म्हटलं की जुहू, गिरगाव चौपाटी, मरिन ड्राईव्ह, गेट वे आॅफ इंडिया या ठिकाणाला सर्वाधिक पसंती असते. त्यामुळे चौपाट्यांसह या ठिकाणीही आता दुपारपासून गर्दी जमण्यास सुरूवात होईल. कारण आता काऊंटडाऊन सुरू झालं असून नववर्ष सुरू व्हायला अवघे काही तासाच उरले आहेत. तेव्हा जसजशी वेळ पुढं जात जाईल तसतसा मुंबईचा माहोल बदलत जाईल आणि मग अवघ्या मुंबईवर झिंग चढेल ती नववर्षाची.


मुंबईकर शहराबाहेर

दरवर्षीच मुंबईत नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात होतं. त्यातही मरिन ड्राईव्ह आणि चौपाट्यांवरील जल्लोषाची मजा काही औरच असते. मुंबईत रात्री उशीरापर्यंत पार्ट्या सुरू असतात. त्यामुळे मुंबईकरांसह परदेशी पर्यटक मुंबईला बऱ्यापैकी न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पसंती देतात. पण मुंबईकरांचा कल मात्र गोवा, कोकण आणि थंड हवेच्या ठिकाणी असतो.


गुलाबी थंडी

त्यात यंदा शनिवार-रविवार सुट्टी असून या दोन सुट्ट्यांना लागून सोमवार-मंगळवारची सुट्टी घेत अनेकांनी गोवा, कोकण, महाबळेश्वर, नाशिक, पुणे गाठलं आहे. महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रात गुलाबी थंडी पडली आहे. महाबळेश्वर-नाशिकचं तापमान इतकं घटलं आहे की या दोन्ही परिसराला काश्मिरचं रूप प्राप्त झालं आहे. त्यामुळं यंदा अनेक मुंबईकरांनी महाबळेश्वर आणि नाशिकमधील वायनरीजला अधिक पसंती दिली आहे.


हाॅटेल्स ते क्रूझ

सुट्टी घेत बऱ्यापैकी मुंबईकर बाहेर गेले असले तरी मुंबईतच न्यू इयर सेलिब्रेशन करण्याचं ठरवलेल्या मुंबईकरांना माॅल, पंचतारांकित हाॅटेल्स, चौपाट्या आणि टेरेस पार्ट्यांची निवड केली आहे. यंदा मुंबईकरांना क्रूझवर सेलिब्रेशन करण्याची सुवर्णसंधीही उपलब्ध झाली आहे ती आंग्रीया क्रूझच्या माध्यमातून. आंग्रीया क्रूझवर दुपारी ४ ते १ जानेवारीच्या पहाटे ४ वाजेपर्यंत पार्टी रंगणार आहे. आकर्षक अशा क्रूझवर न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईकरांना ५ हजार, ६ हजार आणि १० हजार रुपये मोजावे लागणार आहेत. डी.जे. शान, डी.जे. हेमंतसह अन्य दोन डि.जेच्या तालावर झिंगण्याची मजाही यावेळी घेता येणार आहे.


पोलिसांची नजर

एकीकडे न्यू इयर सेलिब्रेशनमध्ये मुंबईकर मग्न असतानाच दुसरीकडे मुंबईतील सर्वच्या सर्व पोलिस फौजफाटा सुट्टी न घेता मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असणार आहे. मुंबईत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि नववर्षाचं स्वागत जल्लोषात मुंबईकरांना करता यावं यासाठी मुंबई पोलिस करडी नजर ठेवून आहे. नववर्षाचं स्वागत करून रात्री उशीरा वा पहाटे घरी पोहोचणं मुंबईकरांना सहजसोप व्हावं यासाठी रेल्वे प्रशासन आणि बेस्ट प्रशासनही सज्ज झाल्या आहेत. रेल्वेच्या सर्व मार्गावर रेल्वेनं विशेष लोकल चालवल्या आहेत. तर बेस्टकडूनही रात्री जादा बस सोडण्यात आल्या आहेत.


जादा बसगाड्या

बेस्ट उपक्रमातर्फे मुंबईतील सागरी किनाऱ्यावर येणाऱ्या मुंबईकरांसाठी जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. सोमवारी रात्री गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील इतर ठिकाणी समुद्र किनारी प्रवाशांच्या सोयीसाठी बसमार्ग क्र. ७ मर्या, १११, ११२, २०३, २३१, २४७ आणि २९४ या मार्गवार एकूण २० जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.



हेही वाचा-

३० डिसेंबरच्या सायंकाळपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा