Advertisement

Coronavirus Updates: रेल्वेच्या ५६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू


Coronavirus Updates: रेल्वेच्या ५६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
SHARES
मुंबईसह राज्यभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णांप्रमाणेच मृतांच्या आकड्यात ही मोठी वाढ झाली आहे. यामध्ये सरकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सामान्य नागरिकांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळं आतापर्यंत रेल्वेच्या ५६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात मध्य रेल्वेच्या सर्वाधिक ४३ कर्मचाऱ्यांचा समावेश असून, उर्वरित कर्मचारी पश्चिम रेल्वेचे आहे.

मुंबईत करोनाची लागण झालेल्यांमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेबरोबरच पश्चिम मध्य रेल्वे आणि उत्तर फ्रंटायर रेल्वे कर्मचारीही आहेत. रेल्वे सुरक्षा दल, लोको पायलट, तांत्रिक कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली असून या कर्मचाऱ्यांची संख्या ५२० एवढी होती. यातील ३४३ कर्मचारी बरे झाले असून ११२ कर्मचारी कोरोनाग्रस्त आहेत.

मुंबईतील जगजीवनराम रुग्णालयात कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. २ जूनपर्यंत मध्य रेल्वेचे १० आणि पश्चिम रेल्वेचे ३ कर्मचारी मृत झाल्याची नोंद होती. १७ दिवसांतच मृतांमध्ये झालेली वाढ ही रेल्वे प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाने १४२ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १२६९ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ५५ मृत्यू हे १६ ते १८ जून चे असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आलेले आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत शुक्रवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११४ रुग्ण दगावले आहेत. तर १३ जून रोजी ६० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १४ जून रोजी एकूण ७९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे १२६९ नवीन रुग्ण आढळले आहेत. 

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ६४ हजार ०६८ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात कोरोनाचे ४०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३२ हजार २५७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा