Advertisement

पालिकेच्या आणखी ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


पालिकेच्या आणखी ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. तसंच, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या ४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. त्यानंतर आता दक्षिण मुंबईत कार्यरत असलेल्या आणखी ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी ३ सफाई कामगारांना लागण झाल्यानं ते कार्यरत असलेली कुंभारवाडा येथील पालिकेची चौकी बंद करण्यात आली आहे.

कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यामुळं मुंबईत मोठ्या प्रमाणात इमारती, परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जेवण अथवा धान्य पुरवठा करण्याची जबाबदारी पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागावर सोपविण्यात आली आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या विलगीकरण कक्षातील नागरिकांनाही ही मंडळी अन्नपुरवठा करीत आहेत.

दक्षिण मुंबईमधील पालिकेच्या ‘सी’ आणि ‘डी’ विभागात कार्यरत ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं. यामध्ये ‘सी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कुंभारवाडा चौकीमधील ३ सफाई कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळं तातडीनं ही चौकी तात्काळ बंद करण्यात आली. ‘डी’ विभाग कार्यालयातील एका शिपायासह दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे.

कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊ लागल्यानं आणि करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागल्यानं अधिकारी, कर्मचारी, कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. करोनाग्रस्त रुग्णांना सेवा देणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांची केवळ तापमान तपासणी न करता स्वाब चाचणी करावी, अशी मागणी करणारे पत्र दि म्युनिसिपल युनियनने महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिकेतील सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना पाठविले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा