Advertisement

कोरोनाने १० दिवसांत 'इतक्या' ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू


कोरोनाने १० दिवसांत 'इतक्या' ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू
SHARES

ज्येष्ठ नागरिकांना करोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांनी ज्येष्ठांची अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. मागील १० दिवसांत ६० वर्षांवरील तब्बल २९० ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ४० ते ६० वयोगटातील मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण अडीचपटहून जास्त आहे.

ज्येष्ठ नागरिक व दीर्घकालीन आजार असणाऱ्या नागरिकांना यामध्ये अधिक संसर्ग होतो आहे. त्यामुळे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे. ७ ते १६ सप्टेंबर या १० दिवसांच्या कालावधीमध्ये २९० ज्येष्ठ नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला. या कालावधीत ४० ते ६० वयोगटातील १०६ जणांचा मृत्यू झाला. यात दीर्घकालीन आजार असलेल्या काही रुग्णांचाही समावेश आहे.

मुंबईत १६ सप्टेंबरला करोनाने ५० जणांचा मृत्यू झाला. यात ६० वर्षांवरील नागरिकांची संख्या ३७ होती. तर, ४० ते ते ६० वयोगटातील ११ व दोन जणांचे वय ४० वर्षांखालील होते. ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. कामानिमित्त घराबाहेर जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांशी होणारा संपर्क जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करावा. घरातील आजोबा-आजी यांच्याशी दुरूनच संवाद साधावा.


घरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच तातडीने करोना चाचणी करून घेण्यात यावी. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.


'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेत पालिकेने घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नागरिकांची ऑक्सिजन पातळी तपासून त्याचा अहवाल तयार करण्यात येत आहे. संशयित आढळल्यास त्याला तातडीने कोरोना काळजी केंद्रात दाखल करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement