वाढत्या कोरोना संसर्गात राज्यात ३१ ते ४० या वयोगटातील रुग्णसंख्येचं प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती समोर येत आहे. या वयोगटातील ४ लाख ७२ हजार ७७६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल ४१ ते ५० या वयोगटामध्ये ४ लाख ५ हजार १०० रुग्ण नोंदवले आहेत. नोकरी, व्यवसाय तसंच, शिक्षणाच्या निमित्तानं या वयोगटामध्ये घराबाहेर काम करणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळं त्यांच्यात संसर्गाचं प्रमाणही अधिक दिसून येत आहे.
३१ ते ४० या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे २१ टक्के व्यक्तीमध्ये संसर्ग झाला आहे, तर त्याखालोखाल ४१ ते ५० या वयोगटामध्ये १७.९९ टक्के व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचं दिसतं. ५१ ते ६० या वयोगटातील १६.३४ टक्के जणांमध्ये ज्यात कोरोना संसर्गाची लागण झाली आहे तर ६१ ते ७० या वयातील ११.१९ टक्के व्यक्ती या संसर्गामुळं बाधित आहे.
मार्च ते ऑगस्ट या कालावधीमध्ये चाळीशीच्या पुढील वयोगटामध्ये कोरोनाचे प्रमाण अधिक होते. उपचारासाठी रुग्णालयांत न जाणाऱ्या व्यक्तींमध्ये निदानासाठी उशीर झाल्यामुळं संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक दिसून आलं होतं. मात्र जून, जुलैमध्ये यात बदल झाला. आता पुन्हा ३१ ते ४० या वयोगटात संसर्गाचं प्रमाण अधिक असल्याचं दिसतं.
राज्यात १० वर्ष वयोगटातील ७४,२८४ इतके रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण ३.३० टक्के इतके आहे. तर ११ ते २० या वयोगटामधील १ लाख ४९ हजार ०९७ म्हणजे ६.६२, २१ ते ३० वयोगटातील ३ लाख ६९ हजार ५८५ म्हणजे १६.४१ टक्के तर ३१ ते ४० या वयोगटातील ४ लाख ७२ हजार ७६२ म्हणजे २१ टक्के व्यक्तींना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे.