Advertisement

विस्तारीत राणीबागेच्या भूखंडाची याचिका रद्द; मफतलाल कंपनीला दणका


विस्तारीत राणीबागेच्या भूखंडाची याचिका रद्द; मफतलाल कंपनीला दणका
SHARES

 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय'  अर्थात राणीबाग परिसरालगत ताब्यात असलेला भूखंड महापालिकेला हस्तांतरीत झाल्यानंतरही त्यावर मफतलाल कंपनीनं हक्क सांगितला होता. याविरोधात मफतलालने न्यायालयात याचिका करून विस्तारीत राणीबागेचा हा भूखंडच हडप करण्याचा डाव रचला होता. परंतु मफतलाल कंपनीनं दाखल केलेली याचिकाच उच्च न्यायालयानं फेटाळत रद्दबातल ठरवली आहे. त्यामुळे आता राणीबागेच्या विस्तारीत प्राणिसंग्रहालयाचा मार्ग सुकर झाला आहे.


मफतलालला भाडेपट्ट्याने

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीचा बाग) आहे. या उद्यानालगत सुमारे ५४ हजार ५६८.७२ चौरस मीटर आकाराचा भूखंड आहे. माझगाव विभागातील सीएस ५९३ क्रमांकाचा हा भूखंड मे. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने देण्यात आला होता. याबाबत महाराष्ट्र शासनाद्वारे वर्ष २००४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेआधारे व सदर भाडेपट्ट्याचा कालावधी वर्ष २०१७ मध्ये संपल्यानंतर; मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांद्वारे या भूखंडाच्या निम्मा अर्थात २७ हजार २८४.३६ चौरस मीटर एवढ्या आकाराचा भूभाग महापालिकेकडे वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले होते.


न्यायालयात याचिका

 २७ हजार २८४.३६ चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता. हा भूखंड मुंबई शहर जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशांनुसार ७ जानेवारी २०१७ रोजी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. परंतु या हस्तांतरणाविरोधात 'मे. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड' यांनी मा. उच्च न्यायालयाकडे विनंती याचिका दाखल केली होती.


विस्तारीकरणास गती मिळणार

याबाबत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढं झालेल्या सुनावणीत ही याचिका रद्दबातल करण्याचे आदेश त्यांनी दिले असल्याची माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे. याचिका रद्द ठरवण्यात आल्यामुळे महापालिकेच्या उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या विस्तारीकरणास अधिक गती मिळण्याची शक्यता  दराडे यांनी व्यक्त केली आहे.



हेही वाचा - 

गुडन्यूज! ठाण्यात दिव्यांगांसाठी १९० घरं

वांंद्रयातील म्हाडा भवन कात टाकणार; १६ मजली टाॅवर होणार





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा