Advertisement

वांंद्रयातील म्हाडा भवन कात टाकणार; १६ मजली टाॅवर होणार

म्हाडा भवनाच्या पुनर्विकासासाठी साधारण ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या इमारतीचं डिझाईन तयार करण्याचं काम मुंबई मंडळाच्या आर्किटेक्ट विभागाकडून सुरू आहे. नव्या विकास आराखड्यानुसार पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाला ५ एफएसआय मिळणार आहे. त्यानुसार १६ मजली टोलेजंग इमारत उभारण्याचा मुंबई मंडळाचा विचार आहे.

वांंद्रयातील म्हाडा भवन कात टाकणार; १६ मजली टाॅवर होणार
SHARES

वांद्रे पूर्वेकडील कलानगर इथं असणारं भव्यदिव्य असं म्हाडा भवन आता लवकरच कात टाकणार आहे. ४० वर्षे जुन्या म्हाडा भवनाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळानं घेतला असून सध्या पुनर्विकासाच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दिपेंद्र सिंह कुशवाहQ यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता लवकरच पाच मजली म्हाडा भवनाच्या जागी १६ मजली टोलेजंग इमारत उभी राहणार आहे.


इमारतीची दुरावस्था

राज्यभरातील गरीबांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत मुंबईसह राज्यभरातील सहा लाखांहून अधिक कुटुंबाचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अशा या म्हाडाचं मुख्यालय वांद्रे, कलानगर इथं आहे. ४० वर्षांपूर्वी म्हाडा मुख्यालयाची अर्थात म्हाडा भवनाची बांधणी करण्यात आली आहे. आता, मात्र या इमारतीची पुरती दुरावस्था झाली असून दुरूस्तीवर इमारत श्वास घेत आहे. अनेकदा इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत आहेत. तर काही ठिकाणी इमारतीला टेकूही लावण्यात आली आहे.


प्रस्ताव धूळ खात 

लाखो कुटुंबियांना हक्काचा निवारा देणारे म्हाडा कर्मचारीच सुरक्षित नाहीत. त्यातच दुरूस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च  मुंबई मंडळाला येत आहे.  या सर्व बाबींचा विचार करता साधारण पाच वर्षांपूर्वीच म्हाडानं म्हाडा भवनाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळानं यासंबंधीचा प्रस्तावही तयार केला होता. पण हा प्रस्ताव गेल्या कित्येक वर्षांपासून धूळ खात पडून होता.  


हालचालींना वेग 

आता मात्र मुंबई मंडळानं पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार यासंबंधीच्या हालचालींना वेग दिला आहे. पुनर्विकास कसा करायचा, किती एफएसआय उपलब्ध आहे, किती एफएसआय आणि कसा वापरता येईल, किती मजली इमारत बांधायची, इमारतीचं डिझाईन कसं असेल अशा अनेक बाबींची चाचपणी सध्या मुंबई मंडळाकडून सुरू असल्याची माहिती कुशवाह यांनी दिली आहे.


५ एफएसआय 

नव्या विकास आराखड्यानुसार पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाला ५ एफएसआय मिळणार आहे. त्यानुसार १६ मजली टोलेजंग इमारत उभारण्याचा मुंबई मंडळाचा विचार आहे. तर बीकेसी, कलानगर परिसराला साजेशी अशी काॅर्पोरेट लुक असलेली इमारत बांधण्याचं मुंबई मंडळाचं लक्ष्य आहे. त्यामुळं पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात येणारी म्हाडाची इमारत ही टिपिकल सरकारी इमारतीसारखी नसणार हे निश्चित.

३०० कोटींचा खर्च 

म्हाडा भवनाच्या पुनर्विकासासाठी साधारण ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या इमारतीचं डिझाईन तयार करण्याचं काम मुंबई मंडळाच्या आर्किटेक्ट विभागाकडून सुरू आहे. दरम्यान सध्या म्हाडाचा मोठा पसारा असून म्हाडा भवनात इतर सरकारी यंत्रणांचीही कार्यालये आहेत. त्यातच बीडीडी चाळींचा पुनर्विकास, धारावी सेक्टर पाच- पुनर्विकास म्हाडाकडे आला आहे. त्यामुळे म्हाडाचा पसारा आणखी वाढला आहे. अशावेळी पुनर्विकास करताना म्हाडाच्या दैनंदिन कामावर फटका बसणार नाही अशी व्यवस्था लावत पुनर्विकास हाती घेण्याचं मोठं आव्हान म्हाडासमोर असणार आहे.


अतिरिक्त जागा भाड्याने

तर पुनर्विकास झाल्यास नव्या टोलेजंग इमारतीत मोठी जागा उपलब्ध होणार असल्यानं अतिरिक्त जागा सरकारी कार्यालयं आणि बँकांना भाड्यानं देत त्यातून चांगलं उत्पन्न मिळवत ते गृहनिर्मितीसाठी वापरण्याचाही मुंबई मंडळाचा विचार आहे. असा हा मुंबई मंडळाचा महत्त्वाकांक्षी पुनर्विकास कधी प्रत्यक्षात मार्गी लागतो आणि म्हाडा भवन कधी कात टाकते हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.



हेही वाचा -

मेट्रो मार्गिका ठरवताना स्थानिकांशी चर्चा का नाही? न्यायालयाचा 'एमएमआरडीए'ला सवाल

Exclusive: सिडकोचं घर अडीच लाखांनी स्वस्त मिळणार!

सिडकोची १४,८३८ घरांची लॉटरी; २५ हजार नवीन घरंही




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा