Advertisement

गरज पडली तर शस्त्र उचलू, जैन मुनींची प्रशासनाला धमकी

यावरून आता जैन समाजाने उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इरादा दर्शवला आहे.

गरज पडली तर शस्त्र उचलू, जैन मुनींची प्रशासनाला धमकी
SHARES

मुंबईतील कबुतरखान्यांवरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना अन्न देण्यास बंदी घातली आहे. तरीही, या निर्णयाला डावलून जैन समाजातील काही व्यक्ती कबुतरांना खाद्य पुरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून आता जैन समाजाने उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इरादा दर्शवला आहे. 

जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 13 तारखेपासून समाज उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

"सरकारी सूचनेनंतर कबुतरांना अन्न देणे सुरू झाले आहे. निवडणुकीचा विचार करून हे चालू आहे. आमचे पर्युषण संपल्यानंतर पुढील पाऊल ठरवू. 13 तारखेला याबाबत अंतिम निर्णय घेऊ. आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत. कबुतरांना अन्न देण्यास बंदी घातल्यास 13 तारखेनंतर आम्ही उपोषणाला सुरुवात करू," असे निलेशचंद्र विजय यांनी स्पष्ट केले.

तसेच, "जैन समाज सौजन्याचा आहे. शस्त्रे उचलणे आमचे धोरण नाही. काही आंदोलनादरम्यान शस्त्रे वापरली गेली, पण ते आमचे लोक नव्हते. तरी गरज भासली तर धर्माच्या रक्षणासाठी आम्ही शस्त्रेही धरू. आम्ही संविधानाला, न्यायालयाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदर देतो. पण जर आमच्या धर्मावर हल्ला झाला, तर आम्ही कोर्टालाही मानणार नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

याशिवाय, "पालिका, न्यायालय किंवा प्रशासनाने आम्हाला नकार दिल्यास आम्ही आंदोलन छेडू. जीवदया हा आमच्या धर्माचा मूलमंत्र आहे. जैन धर्माला का लक्ष्य केले जाते? आम्ही पालिकेकडे अन्न देण्याची परवानगी मागितली आहे. पुन्हा याच ठिकाणी आंदोलन होईल.

देशभरातील लाखो जैन बांधव येथे शांततेत जमतील. मी एकटा राहणार नाही. मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येक प्राण्याचे रक्षण करणे हा आमचा धर्म आहे," असेही त्यांनी नमूद केले.

या वादामुळे दादर परिसरात तणाव निर्माण झाला असून, जैन समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की कबुतरांना अन्न देणे हा त्यांच्या धर्मातील महत्त्वाचा भाग आहे, आणि त्यावर बंदी घालणे अन्यायकारक आहे.

दुसरीकडे, स्थानिक प्रशासन आणि न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा देणारेही असून, हा वाद पुढे काय वळण घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



हेही वाचा

पाळीव प्राण्यांसाठी सोसायटीच्या परवानगीची गरज नाही

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा