SHARE

भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ भारीप बहुजन महासंघ आणि २५० डाव्या तसेच पुरोगामी संघटनांकडून बुधवारी पुकारण्यात आलेला बंद अखेर दुपारी ४ वाजता मागे घेण्यात अाला. भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बंद मागे घेतल्याचं जाहीर केलं. तर बंदमध्ये सहभागी झालेल्या जनतेचे आभार मानतानाच आंबेडकर यांनी संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी उचलून धरली.


अराजकता माजवण्याचा प्रयत्न

देशात काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचा की नाही, हे आता जनतेनेच ठरवायला हवं, असं म्हणतानाच आंबेडकर यांनी भाजपला टार्गेट केलं.


भाजपचा धार्मिक अजेंडा हिंदुत्वाचा

प्रत्येक पक्षाचा एक अजेंडा असतो त्यानुसार भाजपाचाही एक धार्मिक अजेंडा आहे तो म्हणजे हिंदुत्वाचा. धार्मिक अजेंड्यावरच कोणताही पक्ष सत्तेत येतो आणि ५ वर्षे सत्तेत राहतो. ५ वर्षे संपण्याआधी हा अजेंडा रिन्यूव्ह करावा लागतो. दंगल घडवून त्यांनी हा अजेंडा रिन्यूव्ह केला अाहे, असा सनसनाटी अारोप करत प्रकाश अांबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला अाहे.


काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना

मुंबईसह राज्यभर बंद शांततेत पार पडला असून काही ठिकाणी दगडफेकीच्या तुरळक घटना घडल्याचं सांगत आंबेडकर यांनी बंद मागे घेतल्याचं जाहीर केलं. तर भीमा-कोरेगाव हिंसाचार घडवून आणणारे प्रमुख मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अटक व्हावी, हीच आमची प्रमुख मागणी असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या