पाऊस (Mumbai Rain) लांबल्याने (Monsoon) आणि मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai water storage) करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. मात्र जूनअखेरीस सातही धरणांचा आढावा घेऊनच पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या सातही धरणांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.
पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्याच्या घडीला २ लाख ५० हजार ६९१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. यामध्ये राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा आणि भातसा या दोन धरणांतील राखीव कोट्यातील प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठाही आहे. त्यामुळे एकूण १५.६९ टक्के पाणीसाठा असून तो ४८ दिवस पुरेल, असे त्यांनी सांगितले.
अप्पर वैतरणा आणि भातसा या राज्य सरकारच्या दोन धरणांतून राखीव पाणीसाठा मिळत असला तरी अन्य धरणांत पाणीसाठा कमी आहे. पाऊस लांबल्यास पाणीकपातीचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे जूनअखेरीस मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊनच पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
पाणीपट्टीत प्रत्येक वर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यास मुंबई पालिकेने सन २०१२मध्ये मंजुरी दिली आहे. त्यानुसार, सन २०२३-२४ या वर्षासाठी मुंबई महापालिका १६ जूनपासून पाणीपट्टीत वाढ करण्याच्या विचारात होती. ही वाढ ७.१२ टक्क्यांपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पाणीपट्टीवाढीला भाजपकडून विरोध करण्यात आला होता.
हेही वाचा