Advertisement

महापालिकेच्या खातेप्रमुखांची पदे पदोन्नतीनेच भरणार


महापालिकेच्या खातेप्रमुखांची पदे पदोन्नतीनेच भरणार
SHARES

कार्यकारी अभियंता तसेच त्यापेक्षा उच्च श्रेणीतील पदांवर लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ५० टक्के पदे भरली जातात आणि उर्वरीत ५० टक्के पदे ही पदोन्नतीने भरली जातात. परंतु आता ही अटच काढून टाकून खातेप्रमुखांची नियुक्ती ही शंभर टक्के पदोन्नतीनेच भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सामान्य प्रशासनाने याबाबतचा प्रस्तावच विधी समितीपुढे मंजुरीसाठी पाठवला आहे.

कार्यकारी अभियंता आणि उच्च श्रेणीतील पदांवर नियुक्त करण्याचे अधिकार हे महापलिकेला आहेत. तरी या पदावरील नियुक्ती ही सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी चालू राहणार असल्यास त्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचार विनियम करणे आवश्यक असते. अशी पदे राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीनेच महापालिकेने निश्चित करायची असतात. या नियुक्त्या करण्यासाठी कार्यकारी अभियंता आणि त्यावरील पदे निवडीने आणि पदोन्नतीने भरण्याचे अधिकार महापलिका आयुक्त आणि स्थायी समितीला आहेत. सरळ सेवेने ही पदे भरण्यासाठी गुणोत्तर निश्चित नसले तरी आवश्यकतेनुसार महापलिकेच्या रुग्णालयातील अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक अशी पदे तसेच काही वेळा खातेप्रमुखांसारखी पदे सरळसेवेने भरली जातात. तसेच सहायक आयुक्त यासारखे अत्यंत महत्वाचे पद हे १०० टक्के सरळसेवेने भरले जाते.

महापालिका अधिनियम कलम ८० ब ४ नुसार कार्यकारी अभियंता आणि त्यावरील पदांच्या अर्हता महापालिका आयोगाच्या सल्ल्यानुसारच करत असते आणि त्यांना महाराष्ट्र शासनाची मंजुरी घेण्यात येते. परंतु अशी पदे प्रत्यक्ष भरण्यासाठी सरळसेवा आणि पदोन्नतीने ५०:५०चे गुणोत्तर वापरले जावे, अशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे या पदांना सरळसेवा आणि पदोन्नतीचे ५०:५० गुणोत्तर न लावता ही पदे १०० टक्के पदोन्नतीने भरण्यासाठी सामान्य प्रशासनाने विधी समितीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. महापालिका पुरवत असलेल्या पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी सुधारणा, रस्ते, रुग्णालये, शिक्षण इत्यादी सेवांचा व्याप अन्य कोणत्याही महापालिका आणि संस्था यांच्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे अशा खात्यातील उच्च पदावरील नियुक्तीसाठी संबंधित खात्यातील कनिष्ठ अधिकाऱ्यांना कामाचा बऱ्याच वर्षांचा अनुभव असल्याने त्यांना पदोन्नती दिल्याने महापालिका प्रशासनाचा फायदाच होत असतो, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

या पदांना मिळणार लाभ -

प्रमुख लेखापाल, उपप्रमुख लेखापाल, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, उपवैद्यकीय अधिक्षक, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, उप करनिर्धारण व संकलन, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी, प्रमुख अभियंता, उपप्रमुख अभियंता, कार्यकारी अभियंता, उपवास्तू शास्त्रज्ञ, उपमहाव्यवस्थापक देवनार (पशुवधगृह), सहायक महाव्यवस्थापक तथा उप अधिक्षक (बाजार), संयुक्त कायदा अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, मनपा उपचिटणीस, मनपा उपमुख्य लेखापरिक्षक आदी पदे भरताना सरळसेवा आणि पदोन्नतीसाठी आता ५०:५०चे गुणोत्तर लावले जाणार नाही. ही पदे पदोन्नतीनेच भरली जाणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement