कामगार दिनी लघु उद्योजकांनी घेतली बाल कामगार न ठेवण्याची शपथ

 Dharavi
कामगार दिनी लघु उद्योजकांनी घेतली बाल कामगार न ठेवण्याची शपथ
Dharavi, Mumbai  -  

कामगार दिनानिमित्त प्रथम काउंसिल फॉर व्हल्नरेबल चिल्ड्रन संस्था आणि धारावी पोलीस यांच्या वतीने 'हर बच्चेका अधिकार सुरक्षित, हर बच्चा पढा लिखा' यावर आधारित शपथविधी सोहळ्याचे आयोजन धारावी पोलीस ठाण्याच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रथम काउंसिल फॉर व्हल्नरेबल चिल्ड्रन संस्थेच्या प्रोग्राम मॅनेजर कल्पना जाधव, धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बब्बू खान उपस्थित होते. या कार्यक्रमात धारावीतील शेकडो लघू उद्योग आस्थापनेच्या मालकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सर्व लघू उद्योग मालकांकडून बाल कामगार कामावर न ठेवण्याची सार्वजनिकरित्या शपथ घेण्यात आली.

यावेळी कल्पना जाधव म्हणाल्या की, धारावी झोपड्पट्टीबहुल विभागात यावर्षी 15 आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारून 14 वर्षाखालील 25 बालकामगारांना मुक्त करण्यात आले. गतवर्षी पकडलेल्या 35 बालकामगारांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. हा आकडा अतिशय गंभीर आहे. खेळण्या-बागडण्याच्या दिवसात या गरीब चिमुरड्यांकडून काम करून घेणे अत्यंत खेदाची बाब आहे. या मुलांना जगण्याचा अधिकार द्या, शिक्षणाचा अधिकार द्या, त्यांना मदत करा त्यांचे बालपण हिरावून घेऊ नका. जमलेल्या सर्व लघु उद्योजकांनी याची दखल घेतली पाहिजे. दरम्यान जमलेल्या सर्व लघु उद्योजकांनी बाल कामगार न ठेवण्याची शपथ घेतली.

Loading Comments