महापालिका मुख्यालयात नगरसेवकांसाठी ई-वाचनालय


SHARE

मुंबई महापालिका मुख्यालयात नगरसेवकांसाठी असलेलं वाचनालय आता अत्याधुनिक होणार आहे. हे वाचनालय अत्याधुनिक बनवण्यासाठी खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पुढाकार घेतला असून ई-वाचनालयाच्या सुविधेसह ते अद्ययावत करण्यात येणार आहे.


ग्रंथालय दयनीय अवस्थेत

महापालिका व विविध समित्यांचे सदस्य म्हणून सभेच्या कामकाजात भाग घेऊन निरनिराळ्या विषयांसंबंधित प्रस्तावांवर विचार करून निर्णय घेतले जातात. त्यामुळे अशा विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी विविध विषयांचे संदर्भग्रंथ आणि कायदे, अधिनियम तसेच नियमांची पुस्तके महापालिका चिटणीस विभागातील कार्यालयातील ग्रंथालयात नगरसेवकांना उपलब्ध करून दिली जातात. परंतु या ग्रंथालयाची महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अचानक पाहणी केली असता ती दयनीय अवस्थेत दिसून आली. यामध्ये फर्निचर, आसनव्यवस्था जुन्या पद्धतीची असून ग्रंथालयाची जागा अपुरी असल्याने खुद्द महापौरांनी नाराजी व्यक्त केली होती.


अद्ययावत ग्रंथालय हवे

महापालिका मुख्यालयात एकाच वेळी किमान २० नगरसेवक बसू शकतील अशी आसन व्यवस्था आणि ई वाचनालयाची सुविधा असलेले अद्ययावत ग्रंथालय सुरु करण्याची मागणी खुद्द महापौरांनी केली आहे. त्यामुळे ग्रंथालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था पुरवण्यात यावी,अशी खुद्द मागणी महापौरांनी केली असून गटनेत्यांच्या सभेत मान्यता दिल्यानंतर या कामाला सुरुवात होईल.


प्रशस्त, सुसज्ज, ई-वाचनालय

नगरसेवकांकरता असलेले ग्रंथालय वातानुकूलित, प्रशस्त, सुसज्ज तसेच ई-वाचनालयाच्या सुविधेसह अत्याधुनिक पध्दतीने असणे आवश्यक आहे. त्यामुळे विविध विषयांची पुस्तके सहज प्राप्त होतील आणि संदर्भग्रंथ हाताळताना नगरसेवकांना एकाग्रता आणि शांतताही प्राप्त होईल, असा विश्वास महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केला.


हेही वाचा -

महापौर वाचनालयात अवतरतात तेव्हा!

संबंधित विषय
ताज्या बातम्या