Advertisement

कशासाठी? सुट्टीसाठी...शिवसेना नगरसेवकच महापौरांवर नाराज

होळीच्या सणासाठी गावी गेलेल्या नगरसेवकांना शनिवारी होणाऱ्या महापालिका सभेसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. होळीचा सण आणि त्यातच रविवारी शिवजयंती येत असल्यामुळे शनिवारी महापालिकेची सभा घेऊ नये, अशी विनंती शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती.

कशासाठी? सुट्टीसाठी...शिवसेना नगरसेवकच महापौरांवर नाराज
SHARES

'बा देवा म्हाराजा…या महापौराक सुबुद्धी दे रे म्हाराजा', असं गाऱ्हाणं घालायची वेळ मुंबईच्या नगरसेवकांवर आली आहे. आणि त्याला कारण आहे त्यांची शनिवारची सुट्टी आणि महापौरांचा सभेचा अट्टहास!


नगरसेवकांनो...सुट्टी सोडा, मुंबईत या!

होळीच्या सणासाठी गावी गेलेल्या नगरसेवकांना शनिवारी होणाऱ्या महापालिका सभेसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. होळीचा सण आणि त्यातच रविवारी शिवजयंती येत असल्यामुळे शनिवारी महापालिकेची सभा घेऊ नये, अशी विनंती शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती. सेनेच्याच नगरसेवकांनी विनंती केल्यामुळे ती मान्य होईल अशी अपेक्षा या नगरसेवकांना होती. मात्र, महापौरांनी आपला हट्ट कायम ठेवत शनिवारी महापालिकेचं सभागृह बोलावलं आहे. त्यावर महापौरांच्या या कृतीबाबत शिवसेनेच्याच नगरसेवकांकडून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे.


महापौरांचे आदेश आणि नगरसेवकांचे फसलेले बेत

होळीचा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून यासाठी चाकरमनी गावाला जातात. होळीच्या या सणासाठी सध्या सर्व चाकरमन्यांसह नगरसेवकही गावाला गेले आहेत. त्यामुळे होळीचा सण आटोपून एक दिवस गावातला मुक्काम वाढवण्याचा विचार नगरसेवकांचा असला, तरी शनिवारी मार्च महिन्याचे महापालिकेचे पहिले सभागृह असल्याने त्यांना उपस्थित राहण्याचे पक्षाचे आदेश आहेत. त्यामुळे होळीसाठी गावाला गेलेल्यांना शुक्रवारीच मुंबई परतीचा प्रवास करावा लागणार आहे.


सभेला उपस्थित राहावंच लागेल!

होळी आणि त्यानंतर होणारा शिवजयंतीचा कार्यक्रम यामध्ये नगरसेवक व्यस्त होणार असल्यामुळे शनिवारी सभागृह घेऊन नये, अशी सूचना फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पक्षाच्या सभेत सर्वच नगरसेवकांनी केली होती. परंतु आपले महापौर आणि सभागृहनेते यांच्याकडून याचा विचार झालेला नाही, याबद्दल शिवसेनेच्या नगरसेवकांडून खासगीत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. होळीसाठी सणाला गावी जायला हवं आणि शिवजयंतीही साजरी करायलाच हवी. परंतु, महापौरांना आमच्या मागणीचं काहीही पडलेलं नसून पक्षादेश असल्यामुळे या सभेला उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचं काही शिवसेनेच्या नगरसेवकांनी सांगितलं आहे.


'मातोश्री'ही काही करू शकत नाही!

ही बाब काही नगरसेवकांनी ‘मातोश्री’वरही कळवली आहे. परंतु, पहिले सभागृह हे जाहीर झाल्यामुळे ते त्या तारखेला घेणे बंधनकारक आहे. ते रद्द करता येत नाही, हे पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांच्या लक्षात आणून दिल्याने त्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्यात हतबलता दर्शवली आहे. त्यामुळे शनिवारी महापालिका सभागृह होणार असून स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर हे महापालिका सभागृहात अर्थसंकल्प मांडणार आहेत.



हेही वाचा

'आयात' नगरसेवकांमुळे निष्ठावंत घायाळ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा