Advertisement

'आयात' नगरसेवकांमुळे निष्ठावंत घायाळ

मनसेत घुसमट होत असल्यानं या सहाही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. पण यांच्या येण्यानं निष्ठावान आणि जुन्या नगरसेवकांवर जो काही अन्याय होणार आहे त्यांचं काय? या ६ नगरसेवकांचा शिवसेनेतील कायदेशीर प्रवेशाचा मार्ग खुला झाल्यानंतर त्यांनी महापालिकेत पाय ठेवला आणि अपशकून झाला. हा अपशकून म्हणजे दोन ज्येष्ठ नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यत्वाचा द्यावा लागलेला राजीनामा.

'आयात' नगरसेवकांमुळे निष्ठावंत घायाळ
SHARES

ज्या महापालिकेत शिवसेनेनं आपला भगवा ध्वज फडकावत ठेवत सलग २० ते २२ वर्षे सत्ता राखलीय आणि ती महापालिका यापुढे कायम राहावी म्हणून जो काही मनसेच्या पाठित खंजीर खुपसलाय, त्याचा सर्वच स्तरावर निषेध झालाय. नव्हे होतोय. मनसेच्या ७ पैकी ६ नगरसेवकांना फोडून शिवसेनेनं आपल्या पक्षात नियमानुसार सामावून घेतलं.


विद्यमान नगरसेवक मागे

मनसेच्या ६ नगरसेवकांना फोडून शिवसेनेनं कायद्याच्या चौकटीत बसून जो गुन्हा केलाय. त्यामुळे दिलीप लांडे, परमेश्वर कदम, अश्विनी माटेकर, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर आणि अर्चना भालेराव हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या सदस्यांच्या बाकांवर येवून बसलेत. परंतु या ६ नगरसेवकांना बसण्यास जागा देताना, शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांना सभागृहातील मागील बाकांवर सरकावं लागलं. याकडं पाहता पक्षातील स्थानासाठीही त्यांना झगडावं लागणार असल्याचं दिसत आहे.


निष्ठावान नगरसेवकांवर अन्याय

मनसेत घुसमट होत असल्यानं या सहाही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. पण यांच्या येण्यानं निष्ठावान आणि जुन्या नगरसेवकांवर जो काही अन्याय होणार आहे त्यांचं काय? या ६ नगरसेवकांचा शिवसेनेतील कायदेशीर प्रवेशाचा मार्ग खुला झाल्यानंतर त्यांनी महापालिकेत पाय ठेवला आणि अपशकून झाला. हा अपशकून म्हणजे दोन ज्येष्ठ नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यत्वाचा द्यावा लागलेला राजीनामा. पण खरोखर त्यांच्याकडून राजीनामा मागवून घेण्याची गरज काय?


राजीनामा घेणंच चुकीचं

विद्यमान स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे अजून महिनाभराचा अवधी होता. पण त्याआधीच ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांचे राजीनामे मागून घेतले. पण त्यांच्या जागी नेमणूक केली तर कुणाची? माजी महापौर मिलिंद वैद्य आणि मनसेतून आलेल्या परमेश्वर कदम यांची. खरोखरच या दोघांसाठी सातमकर आणि चेंबूरकर यांचा राजीनामा घेणंच चुकीचं आहे. 

पत्ते कापण्याचा प्रयत्न

स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी राजूल पटेल चिठ्ठीत बाद झाल्या नसत्या, तर सातमकर आणि चेंबूरकर यांच्याप्रमाणे पटेल यांनाही राजीनामा द्यायला भाग पाडला असतं. कारण सातमकर, चेंबूरकर यांच्याप्रमाणे विकासकामांच्या प्रस्तावांवर रोखठोक भूमिका मांडून प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम पटेल करतात. त्यामुळे त्यांना या समितीतून बाहेरचा मार्ग दाखवण्याचा पक्का विचारच झाला होता. आता मंगेश सातमकर यांना शिक्षण समिती अध्यक्षपदी आणि चेंबूरकर यांना बेस्ट समिती अध्यक्षपदी बसवून त्यांचे पुनर्वसन होईल, अशी शक्यता वर्तवली जात असली, तरी शेवटच्या क्षणापर्यंत यांचे पत्ते कापण्याचा प्रयत्न केला जाणार हे सत्य नाकारता येत नाही.


स्थायीत काय दिवे लावणार?

या दोन्ही ज्येष्ठ नगरसेवकांच्या आसपासही जाण्याची कदम यांची पात्रता नाही. पण शिवसेनेत प्रवेश घेताना जी कमिटमेंट केली आहे, त्याचा हा भाग असू शकेल. कदम यांच्या झोळीत स्थायी समिती सदस्यत्वाचं पद टाकलं. पण हेच कदम महापालिका सभागृहात चमक दाखवू शकले नाहीत. सुधार समितीत बोलू शकलं नाहीत. ते स्थायी समितीत काय दिवे लावणार हा प्रश्न निश्चितच सर्वाँनाच पडणारा आहे. विशेष म्हणजे परमेश्वर कदम यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल होत आहे. अशा स्थितीत कदम यांना सदस्य बनवून नक्की शिवसेनेला काय साध्य कराचंय?


सभागृह नेतृत्वहिन

महापालिकेत आज शिवसेनेला सक्षम होण्याची गरज आहे. पण तसं होताना दिसत नाही. उलट मातोश्रीतील (मिलिंद नार्वेकर) आशिर्वादाने एकप्रकारे एकाधिकारशाही सुरु आहे. महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षांचे अधिकार हे महापौरांनंतर दुसऱ्या क्रमांकाचे आहेत. पण आज हे पदही शोभेचं बाहुलं झालं आहे.  


रिमोट कुणाच्या हाती?

पूर्वी शिवसेनेचा रिमोट बाळासाहेबांचा हाती असायचा. पण महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांचा रिमोट सभागृहनेत्याच्या हाती आहे. त्यामुळे निश्चितच या पदाचा मान, सन्मान, दरारा आता संपत चाललाय. स्थायी समिती अध्यक्षपदी असलेल्या रमेश कोरगावकर यांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहून ठेवलं जाईल. या पदाचे सर्व अधिकार गमावून सभागृहनेत्यांच्या अधीन झालेले अध्यक्ष म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल. 

सध्या सभागृहनेते यशवंत जाधव यांच्याशिवाय स्थायी समितीचा पत्ता हलत नाही. जाधव हेच आता सभागृहनेता आणि स्थायी समिती अध्यक्षही. त्यामुळे भविष्यात ते समिती अध्यक्षपदावर विराजमान होतील, अशा चर्चा सुरु आहेत. पण ते पद घेऊन सभागृहनेतेपदावर पाणी सोडण्याइतपत राजकारणातले दुधखुळे नाहीत. जाधव हे आपले सभागृहनेतेपद सोडणार नाही. पण स्थायी समिती अध्यक्षपदी कोरगावकर यांच्याप्रमाणे मुकपणे काम करणाऱ्या नगरसेवकाचीच वर्णी लावली जाणार आहे.


अात्मघात करणार?

कुणी म्हणतंय मनसेतून आलेल्या दिलीप (मामा) लांडे यांना स्थायी समिती अध्यक्षपद देणार म्हणून. पण मामा लांडे हे मुरब्बी राजकारणी आहेत. लांडे यांच्या गळ्यात स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ घालून महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हाती देणं म्हणजे हा एक आत्मघातकीपणाच म्हणावा लागेल. महापालिकेत सेनेचे नेते असलेले सभागृहनेते यशवंत जाधव हे हुशार समजले जात असले तरी प्रत्यक्षात लांडेंच्या हुशारीच्या तुलनेत त्यांची हुशारी १० टक्केही नाही.

लांडेंनी आपल्या हुशारीने गट बनवून ६ नगरसेवकांना शिवसेनेत आणलं. त्यामुळे महापालिकेतील सर्वात वजनदार नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. अशा परिस्थितीत लांडेंच्या हाती तिजोरीच्या चाव्या दिल्यास जाधव यांच्यासह सर्वंच ज्येष्ठ नगरसेवकांचे पत्ते कापून ते आपली नवीन लॉबी तयार केली जाईल. लांडेचे हे गुण लक्षात घेऊन शिवसेना त्यांना अध्यक्षपदी बसवण्याची चूक करणार नाही.


वैद्य यांची वर्णी?

त्यातुलनेत कोरगावकर यांच्या स्वभाव गुणधर्म असलेल्या मिलिंद वैद्य यांना अध्यक्षपदी बसवून जाधव आपल्या हाती सभागृहनेते पदाबरोरबच स्थायी समितीच्या दोऱ्या ठेवतील. स्थायी समिती अध्यक्षपद घेतल्यास सभागृहनेते पद सोडावं लागेल. त्यातुलनेत सभागृहनेतेपद ठेवून स्थायी समिती अध्यक्षपदाचं कुंकू कुणाच्याही कपाळावर लावून त्यांना आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न जाधव यांचा असेल. यशवंत जाधव यांच्या डोक्यावर सध्या मातोश्रीचा हात आहे. त्यामुळे त्यांचा शब्द अंतिम मानून मातोश्रीवरूनही त्यांना पाहिजे तसे बदल केले जात आहेत.

मिलिंद वैद्य हे एकेकाळी मातोश्रीच्या अगदी जवळ होते. हिंदु मुस्लिम दंगलीत त्यांनी ज्याप्रमाणे शिवसेनेची कमान सांभाळली, त्याचा राग म्हणून दोन वेळा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. त्यानंतरही ते मृत्यूच्या दारातून परतलेत. कट्टर शिवसैनिक असलेले वैद्य हे शिवसेना नेते मनोहर जोशी यांना शिवसेनेतून बेदखल केल्यापासून थोडेसे पक्षापासून लांबच होते. परंतु नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत वैद्य हे पुन्हा तिकीट मिळवून विजयी झालेत. मातोश्रीच्या अगदी विश्वासातील असल्याने तसेच्या त्यांच्या शब्दाबाहेर नसल्याने त्यांची वर्णी स्थायी समिती अध्यक्षपदी होणार नाही, याची शक्यताच फार कमी आहे.


मनसे पेटून उभी राहणार

मनसेचे जे ६ नगरसेवक शिवसेनेत आलेत, ते पहिले कुणाकडे गेले होते? त्या ६ नगरसेवकांना शिवसेनेकडे कुणी पाठवलंय, याची जेव्हा उत्तर मिळतील तेव्हा भावाला भावा विरोधात लढण्यासाठी कसं खातपाणी घातलं गेलंय हे स्पष्ट होईल. शिवसेना आणि मनसे जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतील, तेव्हाच २०१९ च्या निवडणुकीत भाजपासाठी एकहाती सत्तेची कवाडं खुली होतील, सं म्हटलं जात आहे. या निवडणुकीत मनसे शिवसेनेसाठी डॅमेज फॅक्टर ठरल्यास शिवसेनेचे महापालिकेत बुरे दिन सुरु होतील.


आयात नेते कामी येणार नाहीत

सध्या महापालिकेतील पहारेकरी आवश्यक असेल तेव्हाच शिवसेनेवर हल्ला चढवतात. परंतु जेव्हा समिकरणं बदलतील, तेव्हा प्रत्येक सभेत आणि प्रत्येक प्रस्तावांच्या किंबहुना विकासकामांच्या विषयांमध्ये शिवसेना आणि भाजपा आमने सामने असतील. पण तेव्हा आयात केलेले नेते कामाला येणार नाहीत. तर निष्ठावान आणि ज्यांनी पक्षासाठी घाम तसेच रक्त आटवलंय तेच कामाला येणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पक्षात घेतलेल्या या ६ नगरसेवकांचं पुनर्वसन करतानाच निष्ठावंतांचा अनादर होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा