मुंबई विमानतळावरील वाढता ताण लक्षात घेता नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती करण्यात आली असून लवकरच हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. नवी मुंबई विमानतळ उपनगरातील शहरांना जोडण्यासाठी थेट सहापदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे.
ठाणे ते नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या 25 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी तब्बल साडे सहा हजार कोटी खर्च करण्यात येणार आहे.
या उन्नत मार्गामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीशिवाय सुसाट नवी मुंबई गाठता येणार आहे. मात्र याच्या एकेरी प्रवासासाठी तब्बल 365 रुपये टोल मोजावा लागेल. मुंबईतील समुद्री पूल अटल सेतूवर 250 रुपये टोल आकारला जातो. मात्र ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्गावरील टोल यापेक्षा जास्त असणार आहे.
उन्नत मार्गावर एकेरी प्रवासासाठीच 365 रुपये टोल आकारला जाणार आहे. हा आकडा पाहून प्रवाशांकडून निराशा व्यक्त केली जात आहे.
ठाणे ते विमानतळापर्यंत चार चाकी हलक्या वाहनांसाठी 365 रुपये, हलक्या वाहनांसाठी 590 रुपये, ट्रक-बसेससाठी 1235 रुपये टोल आकारला जाणार आहे. विशेष म्हणजे दरवर्षी टोलच्या दरात वाढ केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. 2031 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर टोल आकारला जाणार आहे.
प्रतिक्षित नवी मुंबई विमानतळ अवघ्या काही दिवसात सुरू होणार असल्याची माहिती आहे. या विमानतावरुन दरवर्षी 20 लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याशिवाय 2038 मध्ये पूर्ण क्षमतेने हे विमानतळ सुरू झाल्यानंतर तब्बल 90 लाख प्रवासी याचा वापर करतील.
हेही वाचा