Advertisement

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचं निधन

फादर स्टॅन स्वामी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा ब्रीच कॅण्डी रूग्णालयाचा वैद्यकीय अहवाल काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचं निधन
SHARES

कोरेगाव भीमा हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात अटक केलेले आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचं निधन झालं आहे. ते ८४ वर्षाचे होते. स्वामी पार्किन्सनसह अनेक आजारांनी ग्रस्त होते.

फादर स्टॅन स्वामी यांना रांचीमधून अटक करण्यात आली होती. त्यांचा सोमवारी दुपारी १.३५ वाजता मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. मुंबई हायकोर्टातील सुनावणीदरम्यानच होली फॅमिली रुग्णालयातील डॉ. डिसूझा यांनी न्यायमूर्ती संभाजी शिदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाला याबाबत माहिती दिली. स्टॅन स्वामी यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न केले, उपचार केले, अशी माहिती डॉ. डिसूझा यांनी मुंबई हायकोर्टाला दिली आहे.

फादर स्टॅन स्वामी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा ब्रीच कॅण्डी रूग्णालयाचा वैद्यकीय अहवाल काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यांनतर त्यांच्यावर योग्य उपचार करणे आवश्यक असून ७ जुलैपर्यत त्यांना होली फॉमिली रुग्णालयात ठेवण्यात यावं असं न्यायालयात सांगितलं होतं.

यापूर्वी फादर स्टॅन स्वामी यांनी उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल होण्यास मुंबई उच्च न्यायालयासमोर नकार दिला होता. रुग्णालयात दाखल होण्यापेक्षा मी तुरूंगातच मरेन, मला कोणत्याही रुग्णालयात दाखल व्हायचे नाही, त्यापेक्षा मला जामीन द्या, मी रांचीला जाईन, असे फादर स्टॅन स्वामींचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई उच्च न्यायालयात उद्गार काढले होते.  

पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी एल्गार परिषद झाली. त्यावेळी दलित समाजाच्या या कार्यक्रमात हिंसाचार उसळला. जमावाकडून वाहनांची जाळपोळ, दुकाने आणि घरांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणात माओवाद्यांशी संपर्क ठेवल्याबद्दल काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी एक स्टॅन स्वामी होते. 

फादर स्टॅन हे झारखंडमधील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते होते. आदिवासींसाठी काम करणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. ते गेल्या अनेक वर्षांपासून वंचित घटकांसाठी कार्य करत होते. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गेल्या वर्षी ९ ऑक्टोबरला त्यांना रांची येथून अटक करण्यात आली होती. कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये सहभागी झाल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ते पार्किन्सन आजाराने ग्रस्त होते. 



हेही वाचा -

भारतात ऑगस्टपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार, एसबीआय रिसर्चच्या अहवालात उघड

  1. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर धावणार विशेष गाड्या
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा