Advertisement

चमचमीत पदार्थांमागचं किळसवाणं सत्य!, अस्वच्छ साॅल्ट अॅण्ड पेपर रेस्टाॅरन्टचं शटर डाऊन


चमचमीत पदार्थांमागचं किळसवाणं सत्य!, अस्वच्छ साॅल्ट अॅण्ड पेपर रेस्टाॅरन्टचं शटर डाऊन
SHARES

रेस्टाॅरन्टमधील चमचमीत पदार्थ खायला कुणाला नाही आवडत. सध्या तर आठवड्यातून ३-४ वेळेस तरी रेस्टाॅरन्टमध्ये जाऊन आवडीच्या पदार्थांवर ताव मारायला जाणाऱ्यांची संख्या कमालिची वाढतेय. त्यासाठी रेस्टाॅरन्टचं नाव, इंटिरीयर आणि चव लक्षात घेऊन तिथं जेवायला जाण्याकडे खवय्यांचा कल असतो. पण या रेस्टाॅरन्टमध्ये शिवजलं जाणारं अन्न स्वच्छ आणि सुरक्षित आहे का? याचा साधा विचारही कुणी करत नाही. मात्र यापुढे असं गाफिल राहणं जीवावर बेतू शकतं. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने बुधवारी ठाण्यातील प्रसिद्ध 'साॅल्ट अॅण्ड पेपर' रेस्टाॅरन्टविरोधात कारवाई करत या रेस्टाॅरन्टचं शटर डाऊन केलं आहे.


काय म्हणतो कायदा?

गेल्या काही वर्षांपासून मुंबई-ठाण्यात अन्न सुरक्षा मानके कायद्याची अंमलबजावणी जोरात सुरू आहे. या कायद्यानुसार हाॅटेल, रेस्टाॅरन्ट, स्टाॅल, शाळा-काॅलेजमधील कॅन्टीन, धार्मिक स्थळं अशा जिथे कुठे अन्न शिजवलं जातं ते ठिकाण स्वच्छ आणि बंदिस्त असायला हवं. अन्न शिजवण्यासाठी 'एफडीए'चा परवाना आणि नोंदणी असायला हवी. कच्चा माल ताजा असावा, अन्न शिजवणारी व्यक्ती निरोगी, स्वच्छ असावी, त्यांनी अॅप्रन घातलेला असावा. अशा एक ना अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिथे जिथे अन्न शिजवलं जातं तिथे या कायद्याचं पालन करणं बंधनकारक आहे. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद आहे.


तक्रारीनुसार कारवाई

या कायद्यानुसार तक्रार वा गुप्तवार्ता मिळाल्यास 'एफडीए'कडून रेस्टाॅरन्ट, हाॅटेलवर छापा टाकला जातो. अशीच कारवाई बुधवारी सकाळी 'एफडीए'च्या ठाणे विभागाकडून करण्यात आली. ठाण्यातील वर्तकनगर येथील साॅल्ट अॅण्ड पेपर रेस्टाॅरन्ट अॅण्ड बारवर छापा टाकण्यात आला. यावेळी ज्या ठिकाणी अन्न शिवजलं जात होतं ते ठिकाण अस्वच्छ होतंच, पण उघड्यावरही अन्न शिजवलं जात असल्याचं यावेळी निदर्शनास आल्याची माहिती सुरेश देशमुख, सहआयुक्त (अन्न) ठाणे विभाग, एफडीए यांनी दिली.


परवानाही नव्हता

महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी अन्न शिजवलं जात होते त्या ठिकाणासाठी परवाना नसल्याचंही या कारवाईतून समोर आलं आहे. तर रेस्टाॅरन्टच्या किचनमध्ये सर्वत्र प्रचंड अस्वच्छता दिसून आली. रेस्टाॅरन्टमधील मॅनेजर हा हाॅटेल मॅनेजमेन्टचा पदवी घेतलेला असावा, अशी अट असताना येथील मॅनेजरने अशी कोणतीही पदवी घेतली नसल्याचंही आढळून आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.


तर, नोंदणी रद्द

अशा अस्वच्छ जागी शिजवलेलं अन्न सुरक्षित नसल्याचं आणि अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन केल्याचं म्हणत एफडीएने या रेस्टाॅरन्टचे शटर डाऊन केलं. रेस्टाॅरन्ट बंद करतानाच रेस्टाॅरन्ट मालकाला नोटीसही बजावण्यात आली आहे. रेस्टाॅरंटमधील त्रुटी दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ठराविक वेळेत या सुधारणा झाल्या नाही, तर या रेस्टाॅरन्टचा परवाना आणि नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असंही देशमुख यांनी सांगितलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा