Advertisement

धारावीतल्या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार


धारावीतल्या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार
SHARES

धारावी - मुंबई मेट्रो 3 च्या कामात अडथळा ठरत असल्याने हाती घेण्यात आलेल्या धारावी येथील शीव-वांद्रे लिंक रोड आणि संत रोहिदास मार्ग जंक्शन येथील नाल्यावरील उड्डाणपुलाचे काम मागील दोन ते तीन वर्षांपासून रखडले होते. परंतु, मुंबई मेट्रो 3 साठी उड्डाणपुलाचा सुधारित आराखडा तयार करुन नवीन कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे रखडलेले हे उड्डाणपुल लवकरच मार्गी लागेल असा विश्वास स्थायी समिती अध्यक्ष, यशोधर फणसे यांनी व्यक्त केलाय.

याबरोबरच ३ उड्डाणपुलांची डागडुजी आणि घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावरील विस्तारीत उड्डाणपुलाचेही काम हाती घेण्यात येणार असल्याचीही माहिती फणसे यांनी दिलीय. धारावी येथील शीव-वांद्रे लिंक रोड आणि संत रोहिदास मार्ग जंक्शन येथील नाल्यावरील पुल खचल्यानंतर येथील पुलाचे काम स्थायी समितीच्या मंजुरीने मे 2013 रोजी मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार पुलाच्या कामाला सुरुवातही करण्यात आली होती. परंतु, हे काम सुरु असतानाच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांनी हे पुलाचे काम मेट्रो 3 प्रकल्पाच्या मार्गात बाधित होत असल्याचे सांगत थांबवण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे पुलाचे काम महापालिकेने थांबवले आणि मेट्रो मार्गाला वगळून पुलाचा सुधारित आराखडा बनवला. यासाठी १० कोटी रुपये अधिक खर्च येणार होता. ही १० कोटी रुपयांची रक्कम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने महापालिकेकडे जमा केली. त्यामुळे नवीन आराखडयानुसार पुलाचा खर्च अधिक असल्यामुळे जुन्या कंत्राटदाराकडून काम करुन न घेता नव्याने निविदा मागवून पात्र कंत्राट कंपनीची निवड करण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा