Advertisement

केरळच्या पूरग्रस्तांना मुंबईकरांचा मदतीचा हात

देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात येत असताना मुंबईकर कसे मागे राहतील? पूर, आग आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा नेहमीच अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांनी केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत नवं स्पिरीट दाखवलं आहे.

केरळच्या पूरग्रस्तांना मुंबईकरांचा मदतीचा हात
SHARES

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये महापुरानं हाहाकार माजवला आहे. महापुरानं आतापर्यंत ३२४ जणांचा बळी घेतला असून ८ हजार कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालं आहे. तब्बल २ लाख कुटुंबं बेघर झाली आहेत. केरळमधील ही परिस्थिती अंगावर काटा आणणारी असून या पुरग्रस्तांना आता खरी गरज आहे ती मदतीची. देशभरातून केरळमधील पुरग्रस्तांना मदतीचा हात पुढे येत असताना मुंबईकर कसे मागे राहतील? पूर, आग आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा नेहमीच अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांनी केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत नवं स्पिरीट दाखवलं आहे.


कुठल्या संस्थेचा समावेश?

मुंबईतील MUSE या सेवाभावी संस्थेनं पुढं येत मुंबईकरांना केरळमधील पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानुसार मुंबईकरांकडून जीवनावश्यक वस्तू जमा केल्या जात आहेत. गेल्या २ दिवसांपासून मुंबई-ठाणे-पुण्यातील १२ ठिकाणी वस्तू जमा करण्यासाठी केंद्र उभारण्यात आले आहेत. या वस्तू रविवारी रात्री मुंबईवरून केरळमध्ये पाठवल्या जातील, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निशांत बंगेरा यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.



मुंबईत कार्यरत

MUSE ही संस्था गेल्या ५ वर्षांपासून मुंबईत कार्यरत असून संस्थेकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. मुंबईतील नैसर्गिक आपत्तींच्या वेळेस पुढं येत ही संस्था मुंबईकरांना मदत करते. केरळमध्ये पूरपरिस्थितीला सुरूवात झाल्यापासून ही संस्था तेथील रहिवाशांना मदत करत आहे.


कुठल्या वस्तूंचा समावेश?

ज्यांना जितकी शक्य होईल तितकी मदत संस्थेने उभारलेल्या मदत केंद्रात करता येणार आहे. त्यासाठी संस्थेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांना आवाहन केलं जात आहे. धान्य, तयार अन्नपदार्थ, मेणबत्त्या, माचिस, टूथब्रश-पेस्ट, ओडोमाॅस, मच्छर अगरबत्ती आणि जेल, साबण, तेल, कपडे, सॅनिटरी नॅपकिन, डेटाॅल, ब्लॅंकेटस, बेडशीट अशा अनेक वस्तू या केंद्राद्वारे जमा केल्या जात आहेत.


चांगला प्रतिसाद

गेल्या २ दिवसांत मुंबईकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला असून मोठ्या प्रमाणावर वस्तू जमा झाल्या आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत या वस्तू जमा केल्या जाणार असून रविवारी दुपारपर्यंत सर्व वस्तूंच पॅकिंग करून त्या विमान वा रेल्वेनं केरळला पाठवण्यात येणार असल्याचंही बंगेरा यांनी सांगितलं. केरळमधील एका सेवाभावी संस्थेच्या मदतीनं या वस्तूंचं केरळमध्ये वाटप करण्यात येणार आहे.


फूड आर्मीही मदतीला

MUSE संस्थेबरोबरच फूड आर्मी ग्रुपनंही मुंबईत ४७ ठिकाणी मदत केंद्र उभारली आहेत. रविवारी सकाळपासून या मदत केंद्रांवरून रेडी टू ईट उपमा, तांदूळ, तूरडाळ, मिल्क पावडर आणि साखर मुंबईकरांकडून जमा केले जाणार आहेत. हे केंद्र पुढची काही दिवस सुरू राहणार असून या केंद्रावरून जमा होणाऱ्या वस्तू विमानानं केरळला पाठवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या सदस्या नीतू सिंग यांनी दिली.

या संस्थांनी घेतलेला हा पुढाकार आणि मुंबईकरांनी उत्स्फूर्तपणे पुढं येत दिलेली ही मदत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा