Advertisement

धुंवाधार पावसामुळे ५ जणांचा बळी, चौघे अजूनही बेपत्ता


धुंवाधार पावसामुळे ५ जणांचा बळी, चौघे अजूनही बेपत्ता
SHARES

बुधवारी पावसाने उघडीप घेत मुंबईकरांना दिलासा दिला असला तरी पावसाने माजवलेल्या हाहाकाराचे भीषण वास्तव आता समोर येत आहे. मंगळवारच्या या भीषण पावसात पाच जणांचे प्राण गेले असून चौघे अद्यापही बेपत्ता आहेत. या पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत कित्येक मुंबईकर जखमी देखील झाले आहेत.


सब स्टेशनची भिंत कोसळली

मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीत पाच मुंबईकरांना प्राणांना मुकावे लागले आहे. घाटकोपरच्या असल्फा गावातील एका घरावर रिलायन्स सब स्टेशनची भिंत कोसळून झालेल्या अपघातात रामेश्वर गुप्ता (४५) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा ९ वर्षीय मुलगा क्रिश तिवारी आणि त्यांची पत्नी मंजू तिवारी (३५) जखमी झाल्या आहेत.


विक्राेळीत दरड कोसळली 

विक्रोळीच्या सूर्यानगर येथे अतिवृष्टीमुळे टेकडीचा काही भाग खचला. त्यात आंबेडकर चौकातील पंचशील चाळ कमिटीतील दोन घरे कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर किरण देवी पाल (२५) ही महिला गंभीर जखमी झाली.
विक्रोळीतील दुसऱ्या एका दुर्घटनेत घराची भिंत कोसळून कल्याणी जंगम नावाच्या २ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गोपाळ जंगम (३६) आणि छाया जंगम (३०) हे जखमी झाले आहेत.


चार मुंबईकर गेले वाहून 

एल्फिन्स्टन परिसरात उघड्या ड्रेनेजमध्ये एक ५५ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती वाहून गेल्याचे अनेकांनी पाहिले. पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

दहिसरला देखील अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला असून कोकणीपाडा येथील नाल्यावरील लाकडी पूल यावेळी वाहून गेला त्यात पुलावरील गौरेश उघडे आणि प्रतिक घाटाळ (२०) हे दोन तरुण वाहून गेले. यावेळी गौरेशला स्थानिकांनी सुखरुप बाहेर काढले, पण प्रतिकचा अद्याप पत्ता नाही.

रात्रीच्या सुमारास कंदिवलीच्या महिंद्रा यलोगेट येथील नाल्यात पडलेली सायकल काढण्यासाठी उतरलेला ओमप्रकाश निर्मल (२६) हा नाल्यातील प्रवाहात वाहून गेला.


सायनमध्ये एका वकिलाचा मृत्यू

सायन येथे बुधवारी ७.३० वाजता गांधी मार्केटजवळ प्रियेन हे ३० वर्षाचा वकील कारमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.   


गणेशविसर्जन करताना १७ वर्षीय मुलगा वाहून गेला 

गणेशविसर्जन करताना १७ वर्षीय मुलगा पाण्यात बुडल्याचा दुर्दैवी प्रकार मढ जेट्टी यथे घडला. अंधेरीला राहणार रोहितकुमार चिंनू शहा (१७) हा गणपती विसर्जन करत असताना पाण्यात बुडाला. अग्निशमन दल आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून देखील तो सापडला नाही.


हेही वाचा - 

वरळीत सर्वाधिक पाऊस

बॉम्बे हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉ. दिपक आमरापुकर बेपत्ता



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा