
नवी मुंबई (navi mumbai) विमानतळापर्यंत प्रवास करताना प्रवाशांना कॅब-रिक्षासाठी अव्वाच्या सव्वा भाडं भरावं लागत आहे. तसेच या प्रवासात वेळही अधिक जातो.
सिडकोने यासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबई (mumbai) आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी मेट्रो मार्गिका, ठाण्यापासून उन्नत मार्ग, NAINAची उभारणी यासह अनेक प्रकल्पांमुळे प्रवास सोपा होणार आहे.
सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी 'द इंडियन एक्सप्रेस' सोबत बोलताना अशाच एका महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल माहिती दिली.
दक्षिण मुंबईहून नवी मुंबई विमानतळापर्यंत कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी उलवे सागरी किनारा मार्ग (coastal road) बांधण्यात येत आहे. हा मार्ग अटल सेतूपासून सुरू होईल.
दक्षिण मुंबईहून येणाऱ्या वाहनांना सध्या चिर्ले जंक्शन आणि अमरा मार्गे प्रवास करून विमानतळापर्यंत पोहोचता येतं. या नव्या कोस्टल रोडमुळे एक थेट दुवा निर्माण होणार आहे.
उलवे सागरी किनारा मार्गाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. यापूर्वी ऑगस्ट - सप्टेंबर 2026पर्यंत हा मार्ग प्रवासासाठी खुला होईल अशी अपेक्षा होती. पण पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीमुळे काही काम रखडलं आहे.
त्यामुळे नोव्हेंबर 2026पर्यंत हा मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. हा मार्ग तयार होताच दक्षिण मुंबईतील अटल सेतूपासून नवी मुंबई विमानतळ केवळ पाच मिनिटांत गाठता येणार आहे.
याशिवाय मेट्रो लाइन 8 चं बांधकामही सुरु होणार आहे. या 32 किलोमीटर मार्गाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. सविस्तर प्रकल्प अहवालाचा सध्या अभ्यास सुरू आहे.
9.5 किलोमीटर लांब मार्गिका भूमिगत असेल. या मार्गाच्या बांधकामात काही अडथळे येत असून काही किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे.
यानंतर येत्या दोन आठवड्यात अंतिम अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल सिडको राज्य सरकारसमोर निधीसाठी मांडणार आहे. त्यानंतर येत्या दोन महिन्यात यासाठी निविदा काढण्यात येतील.
नवी मुंबई विमानतळाच्या उत्तरेकडेही एक मार्ग उभारण्यात आला आहे. कळंबोलीहून विमानतळापर्यंत थेट मार्ग आहे. दरम्यान, पनवेलवरून विमानतळाच्या पूर्वेला जोडणारा मार्गही तयार झाला आहे.
यासह पनवेल द्रुतगती महामार्गापासून विमानतळापर्यंत थेट रस्ता बांधण्याचं कामही सध्या सुरू आहे. या मार्गावर तीन पूल आहेत ज्यापैकी दोन पूल तयार आहेत. येत्या काही महिन्यात शेवटचा पूल सुद्धा तयार होईल.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील प्रवाशांसह पुणेकरांसाठी ही एक मार्ग तयार करण्यात येणार आहे. MSRDC एक क्लोवरलीफ इंटरचेंज बांधत आहे. या इंटरचेंजवरून पुलांपर्यंत पोहोचता येणार आहे आणि पुलांमुळे विमानतळ गाठता येणार आहे.
हेही वाचा
