Advertisement

राज्यात 98 टक्के पाऊस होण्याची शक्यता

हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे.

राज्यात 98 टक्के पाऊस होण्याची शक्यता
SHARES

राज्यात (maharashtra) यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि 'कृषी हवामान फोरम साऊथ आशिया'चे संस्थापक सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी सोमवारी व्यक्त केला.

नवशक्तीने दिलेल्या बातमीनुसार, या अंदाजामध्ये 5 टक्के कमी-अधिक तफावत असू शकते असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. साबळे यांनी जून ते सप्टेंबर या कालावधीचा दीर्घकालीन पावसाचा अंदाज सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला.

हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे.

जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिल, असे त्यांनी सांगितले.

यंदा पावसाचे (rainfall) वितरण असमान राहण्याची चिन्हे आहेत. राज्यातील धुळे, सोलापूर, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि पुण्याचा पूर्व भाग अशा काही भागांमध्ये पावसाचे मोठे खंड पडण्याची दाट शक्यता आहे.

या खंडांचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होणार असल्याने शेतकऱ्यांनी यंदा कमी कालावधीची, कमी पाण्याची आणि आंतरपीक पद्धतीचा प्रामुख्याने अवलंब करावा, असे आवाहन डॉ. साबळे यांनी केले.

मुंबई (mumbai) आणि पुण्याचा (pune) पाण्याचा प्रश्न मात्र यंदा गंभीर होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी वर्तवलेल्या ‘सुपर एल-निनो' किंवा भीषण दुष्काळाच्या भीतीला न घाबरता शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध शेती करावी, कारण राज्याच्या बहुतांश भागात पाऊस 90 टक्क्यांच्या खाली जाणार नाही, असा विश्वासही डॉ. साबळे यांनी व्यक्त केला.

शेतीविषयक सल्ला देताना डॉ. साबळे म्हणाले, किमान 65 मिमी पाऊस होत नाही किंवा जमिनीत दोन ते तीन फूट खोलीपर्यंत पुरेसा ओलावा जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

लवकर पेरणी केल्यास पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटण्याची भीती असते. शेतकऱ्यांनी मूग, मटकी, चवळी, उडीद, सोयाबीन, बाजरी आणि ज्वारी यांसारख्या कमी कालावधीच्या पिकांचे क्षेत्र वाढवावे.



हेही वाचा

कोकण रेल्वेचे विशेष पावसाळी वेळापत्रक जाहीर

कुलाब्यात शववाहिकेवरील भाजप नेत्यांच्या प्रचारावरून वाद

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा