Advertisement

महापौर बंगल्याचा वाद: 'यापुढे दराडेंना नोटीस पाठवाल तर बघा', राज्यसरकारने महापालिकेला खडसावलं


महापौर बंगल्याचा वाद: 'यापुढे दराडेंना नोटीस पाठवाल तर बघा', राज्यसरकारने महापालिकेला खडसावलं
SHARES

शिवाजी पार्क येथील महापौरांच्या निवासस्थानी शिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारक उभारल्या जाण्याच्या कामाला गती दिली जात असली तरी महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाचा अजूनही पत्ताच नाही. महापौरांच्या पर्यायी निवासस्थानासाठी मलबारहिल येथील जलअभियंत्यांचा बंगला देण्याची मागणी होत आहे. पण हा बंगला मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील सचिव प्रवीण दराडे आणि त्यांच्या पत्नी पल्लवी दराडे यांनी अडवून ठेवला आहे. दराडे दाम्पत्य काही हा बंगला सोडायला तयार नाहीत.
उलट राज्य शासनाच्या राजशिष्टाचार विभागाने, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना 'दराडे कुटुंबांना, हा बंगला सेवानिवृत्तीपर्यंत देण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे दराडेंना नोटीस पाठवायची नाही' असं म्हणत पत्रातून खडसावलं आहे, असा गौप्यस्फोट माजी महापौर विशाखा राऊत यांनी सुधार समितीच्या बैठकीत केला आहे.


विशाखा राऊत यांचा गौप्यस्फोट

मुंबईच्या महापौरांना पर्यायी निवासस्थान हे भायखळा राणीबागेत दिलं जातं. पण हे निवासस्थान महापौरांनी नाकारले असून त्यांनी मलबारहिलमधील बंगल्याची मागणी केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका माजी महापौर विशाखा राऊत यांनी मागील दोन बैठकांमध्ये हरकतीचे मुद्दे उपस्थित करत प्रशासनाला दराडे कुटुंबाने अडवलेला बंगला खाली करण्याच्या सूचना केल्या. मात्र, बुधवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत मलबारहिलमधील बंगल्याबाबत कोणतेही उत्तर न आल्यामुळे विशाखा राऊत यांनी याबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना राज्य शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडून एक पत्र आल्याचा गौप्यस्फोट केला.


हा आयुक्तांचाही अपमान

आयुक्तांना पाठवलेल्या या पत्रामध्ये, राज्य शासनाने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल हे राज्य शासनाच्या बंगल्यात राहत आहेत. मग प्रविण दराडे हे महापालिकेच्या बंगल्यात राहिले तर प्रश्न उद्भवला कुठे असा सवाल केला आहे. त्यामुळे यापुढे दराडेंना कोणत्याही प्रकारची नोटीस पाठवायची नाही, असे त्यांनी या पत्रात म्हटल्याचे राऊत यांनी सांगितले. दराडे हे महापालिकेत कार्यरत नसले तरी बृहन्मुंबईत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना हा बंगला सेवानिवृत्तीपर्यंत देण्यात आल्याचेही म्हटले असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यामुळे हा सर्व प्रकार धक्कादायक असून हा महापौरांचाच नव्हेतर आयुक्तांचाही अपमान असल्याचे त्यांनी सांगितले.


ही बाब धक्कादायक

राणीबाग परिसर हा शांतता क्षेत्रात मोडत आहे. त्यामुळे महापौरांकडे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये बाधा येईल किंबहुता तसे कार्यक्रम तिथे करता येणार नाही. त्याऐवजी मलबार हिलमधील बंगल्यात महापौरांचे निवासस्थान बनल्यास त्या पदाचा सन्मानही राखला जाईल. याच बंगल्याच्या रांगेत पुढे मंत्र्यांचेही बंगले असल्यामुळे महापौरांच्या बंगल्यासाठी तीच योग्य जागा असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंगला सोडला नाही म्हणून शासनाच्या अधिकाऱ्यांना निवृत्ती होईपर्यंत बंगला देणे, ही बाब धक्कादायक असून अशाप्रकारे महापालिकेचे एकेक बंगले अडवले जातील, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा