Advertisement

वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे काम 1 ऑक्टोबरपासून


वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे काम 1 ऑक्टोबरपासून
SHARES

वर्सोव्याहून वांद्र्याला जाण्यासाठी मुंबईकरांना एस. व्ही. रोड आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करत तब्बल एक ते दीड तास घालवावा लागतो. 2020 नंतर मात्र मुंबईकरांचा वर्सोवा ते वांद्रे हा प्रवास केवळ 20 मिनिटांमध्ये पूर्ण होणार अाहे, तोही अगदी सुकर. कारण वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पाला नुकताच केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कामाला लागले आहे. त्यानुसार येत्या तीन महिन्यांत निविदा अंतिम करत 1 ऑक्टोबरपासून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


हेही वाचा - 

सी लिंकची टोलवसुली पुन्हा एमईपीएलकडेच

वांद्रे-वर्सोवा सी लिंकला पुढच्या वर्षीचा मुहूर्त


मुंबईतील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून सी लिंकचा पर्याय शोधून काढण्यात आला. त्यानुसार वांद्रे-वरळी सागरी मार्ग प्रकल्प पूर्ण करत हा प्रकल्प 2009 पासून सेवेत दाखल करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा वरळी-नरीमन पॉईट असा विस्तार रखडला असला तरी आता वर्सोवा-वांद्रे असा विस्तार मात्र मार्गी लागत आहे. एस.व्ही.रोड आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत हा प्रकल्प एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. त्यानुसार अंदाजे 10 किमीच्या या प्रकल्पासाठी याआधीच निविदा मागवण्यात आल्या असून, पाच कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या पाच कंपन्यांमधून आता कोणती कंपनी बाजी मारेल, हे लवकरच समजेल. दरम्यान मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधांना समितीने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने आता हा प्रकल्प पुढे नेण्यात येणार आहे.

हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने पर्यावरणासंबंधीची आणि सीआरझेडची परवानगी याआधीच घेण्यात आली आहे. तर या प्रकल्पासाठी अंदाजे 7502 कोटी इतका खर्च येणार असून, या खर्चाची उभारणीही पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे आता निविदा प्रक्रिया आणि उरलेल्या इतर परवानग्या घेत या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे मोपलवार यांनी सांगितले आहे. या प्रकल्पामुळे वांद्रे ते वर्सोवा असा थेट प्रवास करता येणार असल्याने मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल, असा दावा एमएसआरडीसीकडून केला जात आहे. मात्र या प्रवासासाठी मुंबईकरांना सन 2059पर्यंत टोल मोजावा लागणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा