Advertisement

हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता

हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम पावसाळ्यानंतर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता
SHARES

हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम पावसाळ्यानंतर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील गोरेगाव रेल्वे स्थानकापासून बोरिवली स्थानकापर्यंत करण्यात येणाऱ्या विस्ताराच्या प्रकल्पाचा अहवाल बनवण्याचं काम करण्याची प्रक्रिया अत्यंत संथगतीनं सुरू असून, हा अहवाल हाती येण्यास ६ महिने लागणार आहेत.

पुढची प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष विस्तारीकण कामाला सप्टेंबरनंतर सुरुवात होण्याची शक्यता आहे. परिणामी हार्बर मार्गावरील प्रवाशांना या सेवेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल, सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगावदरम्यान लोकल धावते. यापूर्वी गोरेगावऐवजी सीएसएमटी ते अंधेरीपर्यंत हार्बर सेवा सुरू होती. अनेक प्रवासी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते अंधेरी दरम्यान प्रवास करून नंतर पश्चिम रेल्वेने पुढे जात होते.

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हार्बर सेवेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ करीत होते. हे काम मार्गी लागण्यास डिसेंबर २०१७ उजाडले. अनंत अडचणींमुळे प्रत्यक्षात गोरेगावपर्यंत लोकल गाडय़ा मार्च २०१९ पासून धावू लागल्या. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर गोरेगावपर्यंत असलेली हार्बर सेवा बोरिवलीपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रकल्पाचे सर्वेक्षण, नियोजन, प्रकल्पाचा खर्च, भूसंपादन इत्यादींसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची पश्चिम रेल्वेनं तयारी सुरू केली. फेब्रुवारीत स्वारस्य प्रस्ताव मागविण्यात आले होते. जवळपास १३ सल्लागारांनी यात उत्सुकता दाखवली. कोरोनामुळे लागू लॉकडाऊनमुळं हे काम थांबले. नोव्हेंबरमध्ये सल्लागार नियुक्त होणार होती. त्यानंतर ३-४ महिन्यांत त्यांचा अहवाल पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे यासाठी आणखी पाच ते सहा महिने लागणार असल्याची माहिती समोर येतात आहे.

या विस्तार प्रकल्पानंतर हार्बर बोरिवलीपासून विरापर्यंतही पुढे नेण्याचा प्रयत्न असणार आहे. सध्या बोरिवलीपर्यंत पाच मार्ग असून सहावा मार्गही होणार आहे. तर आणखी हार्बरच्या दोन मार्गिकांची भर पडेल. त्यामुळे आठ मार्गिका बोरिवलीपर्यंत होतील. हे काम एमआरव्हीसीमार्फत होईल. त्यामुळे सीएसएमटीपासून थेट विरापर्यंत हार्बरनेही जाता येणे शक्य होणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा