Advertisement

फेरीवाले पुन्हा रस्त्यावर! महापालिका, पोलिसांचा धाक झाला कमी!!

पोलिस आणि महापालिकेचा धाक कमी होत असल्याने रस्त्यावर पुन्हा एकदा फेरीवाले दिसू लागले आहेत. महापालिकेच्या कारवाईचा कोणताही धाक आता फेरीवाल्यांमध्ये राहिलेला नाही. त्यामुळे दादरसह सर्वच रेल्वे स्थानकांचा परिसर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी गजबजून गेल्याचं चित्र दिसत आहे.

फेरीवाले पुन्हा रस्त्यावर! महापालिका, पोलिसांचा धाक झाला कमी!!
SHARES

मनसेच्या आंदोलनानंतर मुंबईतील रेल्वे स्थानकं, धार्मिक स्थळं, महापालिका मंडई, रुग्णालय आदींपासून ठराविक अंतरावर फेरीवाल्यांना बसण्यास बंदी घालण्यात आली. सर्वत्र सुरक्षा व्यवस्था चोख ठेवल्याने हे सर्व परिसर मोकळे दिसू लागले. पण आता पोलिस आणि महापालिकेचा धाक कमी होत असल्याने रस्त्यावर पुन्हा एकदा फेरीवाले दिसू लागले आहेत. महापालिकेच्या कारवाईचा कोणताही धाक आता फेरीवाल्यांमध्ये राहिलेला नाही. त्यामुळे दादरसह सर्वच रेल्वे स्थानकांचा परिसर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी गजबजून गेल्याचं चित्र दिसत आहे.



कारवाई मंदावली

मुंबईतील रेल्वे स्थानकापासून १५० मीटर आणि रुग्णालय, शाळा-कॉलेज, महापालिका मंडई आणि धार्मिक स्थळापासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास बंदी घालण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन तसेच पोलिसांकडून करण्यात येत आहे. परंतु या फेरीवाल्यांवर २ महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईच्या तुलनेत आता ही कारवाई मंदावल्याचं दिसून येत आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरासह इतर ठिकाणीही फेरीवाले पुन्हा धंदा करण्यास बसू लागले आहेत.


कुठे आहेत फेरीवाले?

दादर रेल्वे स्थानकासमोरील बाजूस तसेच रानडे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग आणि एन.सी. केळकर मार्ग यावर फेरीवाल्यांना बसण्यास पूर्णपणे बंदी असतानाही या सर्व मार्गांवर आजही फेरीवाले बसलेले दिसून येत आहेत.



फौज बिनकामाची

फेरीवाले बसू नये आणि त्यांना हाकलून लावण्यासाठी महापालिकेने खासगी सुरक्षा रक्षकांची फौज तैनात केली आहे. परंतु हे खासगी सुरक्षा रक्षक महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबतच फिरत असताना. महापालिकेचे अधिकारी नसताना त्याच्या डोळ्यादेखत फेरीवाले बसत असतानाही ते त्यांना रोखत नाहीत. त्यामुळे या खासगी सुरक्षा रक्षकांवर केला जाणारा खर्च निष्फळ ठरताना दिसत आहे.


काय म्हणतात स्थानिक?

दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला केशवसुत उड्डाणपूलाखाली संध्याकाळी ६ वाजेनंतरच फेरीवाले बसण्यास सुरुवात होतात. एकीकडे याठिकाणी फेरीवाले बसत असताना, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. तर दुसरीकडे रानडे मार्ग, डिसिल्व्हा मार्गावर १५० मीटरच्या बाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, परंतु आतील फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप येथील स्थानिकांकडून केला जात आहे.



कारवाईची मानसिकताच नाही

महापालिकेचे अधिकारी व पोलिस यांचा कोणताही धाक नसून केवळ कारवाईचे नाटक करून एकप्रकारे फेरीवाल्यांना पुन्हा बसण्याची संधी उपलब्ध करून देत असल्याचाही आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. फेरीवाल्यांना कायमस्वरुपी हटवण्याची मानसिकता ही येथील महापालिकेचे अधिकारी व पोलिसांची नसल्याचे त्यांनी सांगितलं.

मनसेच्या आंदोलनानंतर खऱ्या अर्थाने ही कारवाई सुरु झाली, पण आता मनसेचे कार्यकर्तेही शांत बसल्याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे.



रेल्वे पोलिसांकडूनही दुर्लक्ष

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ घड्याळ आणि इतर वस्तूंची विक्री करणारे फेरीवाले बसत असतानाही त्यांच्यावर रेल्वे पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. महापालिकेचे अधिकारी सध्या फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्रांबाबत लोकांकडून हरकती व सूचना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हाती घेण्यात आलेली कारवाईची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे फेरीवाल्यांना हटवण्यास महापालिकेचे अधिकारी पूर्णपणे अपयशी ठरत असल्याची चर्चा सध्या चौकाचौकात ऐकायला मिळत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा