Advertisement

एका मुंबईकराचं मुंबईकरांसाठी खुलं पत्र!


एका मुंबईकराचं मुंबईकरांसाठी खुलं पत्र!
SHARES

'नेमेचि येतो पावसाळा' या उक्तीनुसार 'नेमेचि तुंबते मुंबई' या ओळीसुद्धा मुंबईसाठी तंतोतंत लागू पडाव्यात अशी सध्याची परिस्थिती आहे. दरवर्षी तुंबणाऱ्या मुंबईसोबतच त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टिकचीही मुंबईकरांना बहुधा सवय झाली असावी. त्यामुळे दरवर्षी प्लॅस्टिक वाढत जातं आणि दरवर्षी मुंबई तुंबत जाते. पण याला फक्त पालिकेलाच जबाबदार न धरता मुंबईकर म्हणून आपणही ती जबाबदारी घ्यायला नको का? हाच प्रश्न एका मुंबईकरानं सर्व मुंबईकरांना लिहिलेल्या खुल्या पत्रामध्ये विचारला आहे. सध्या सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल होत आहे. काय आहे हे पत्र?



मूळ इंग्रजी पत्रात लिहिलेल्या मजकुरानुसार....

मी एक मुंबईकर आहे...मुंबईतल्या पावसानंतर आणि त्यानंतर उडालेल्या गोंधळानंतर मी टीव्ही आणि इतर प्रसारमाध्यमांना पालिकेवर टीका करताना पाहतोय. हो मला हे मान्य आहे की पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला लागलीच प्रतिसाद देण्यात किंवा पाणी तुंबू नये म्हणून आधीच उपाययोजना करण्यात पालिका कमी पडली..किंबहुना सपशेल अपयशी ठरली. पण तुम्हीसुद्धा एक मुंबईकर म्हणून त्या दिवशी अपयशी ठरला नाहीत का?

तुम्ही प्रत्येक वेळी रेल्वेने प्रवास करताना प्लॅस्टिकचे रिकामे पाऊच, प्लेट्स, चमचे खिडकीतून थेट बाहेर फेकता... या प्लॅस्टिकचं विघटनसुद्धा होत नाही... त्यामुळे ते थेट रेल्वेलाईनच्या वॉटर ड्रेन्समध्ये(आऊटलेट) अडकतं... मग ट्रॅक्सवर पाणी साचतं आणि ट्रेन बंद पडतात... याला कोण जबाबदार? पालिका की तुम्ही?

तुम्ही वापरलेले कॉण्डोम, सॅनिटरी पॅड आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांसारख्या गोष्टी डस्टबिनमध्ये न टाकता थेट टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करता... त्यामुळे ड्रेनेज लाईन तुंबते... यासाठी कोण जबाबदार? पालिका की तुम्ही?

तुम्ही तुमच्या गाड्या रस्त्यांवर कशाही पार्क करता... त्यामुळे मग अनेकदा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना गटारं व्यवस्थित साफच करता येत नाहीत!... याला कोण जबाबदार? पालिका की तुम्ही?

तुम्ही घरातला कचरा ओला आणि सुका असा वेगळा करत नाहीत... तुम्ही आणि तुमचा कचरा गोळा करणारे कर्मचारी तो कचरा अतिशय बेजबाबदारपणे रस्त्यावरच टाकता... हा कचरा पुढे पावसाच्या पाण्यात मिसळतो... याला कोण जबाबदार? पालिका की तुम्ही?

तुम्ही बाजारात जाताना कधीच कापडी पिशव्या किंवा पर्यावरणपूरक पिशवी, बॅग घेऊन जात नाहीत... उलट दुकानदार किंवा भाजीवाल्यासोबत प्लॅस्टिकची पिशवी देण्यासाठी वाद घालता... याला कोण जबाबदार? पालिका की तुम्ही?

तुम्ही बाहेर फिरायला जाताना पिण्याचं पाणी घरातल्याच पुन्हा वापरता येऊ शकणाऱ्या बाटलीत घेऊन जाऊ शकता... पण तरी, तुम्ही बाहेर जाऊन तिथून प्रत्येक वेळी मिनरल वॉटरची बाटली विकत घेता... टाकाऊ प्लॅस्टिकची अजून भर घालता... याला कोण जबाबदार? पालिका की तुम्ही?

बदल हा आपल्यापासूनच सुरु होतो... म्हणून आधी जबाबदार नागरिक बना!

या मेसेजमध्ये मांडण्यात आलेले मुद्दे बहुधा सर्व मुंबईकरांना आधीपासूनच माहिती असतील. अनेक पर्यावरणप्रेमी हे मुद्दे वारंवार पोटतिडकीने मांडत आले आहेत. मात्र बहुधा मुंबईकरांना हे कळतंय पण वळत नाही.



'आम्ही प्लॅटफॉर्मवरच कचरा टाकणार!'

मंगळवारी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मुसळधार पाऊस झाला... रेल्वेस्टेशन्सवर हजारो मुंबईकर अडकले... यावेळी त्यांना प्लॅटफॉर्मवरच्या रेल्वेच्या स्टॉल्सवर मिळणारे वेफर्स, चिवडा, बिस्किटं यांचा आधार होता. पण 'मुंबई लाइव्ह'नं तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर एक भयानक वास्तव समोर आलं.

भर पावसात प्लॅटफॉर्मवर या वेफर्स, बिस्किट, चिवड्याच्या रिकाम्या पाऊचचा खच पडला होता. सुदैवाने 'मुंबई लाइव्ह'ने संवाद साधलेल्या काही मुंबईकरांनी खाल्लेल्या पदार्थांचे रिकामे पाऊच खिशात ठेवण्याचे सौजन्य दाखवले. पण इतरांनी मात्र 'हे पाऊच आम्ही प्लॅटफॉर्मवरच टाकणार' अशा उद्धट प्रतिक्रिया दिल्या.

29 ऑगस्टच्या पावसात प्लॅटफॉर्मवर साचलेल्या प्लॅस्टिकबद्दल काय म्हणाले मुंबईकर?



काही मुंबईकरांच्या या अशा वृत्तीमुळे पुन्हा मुंबई तुंबण्याची वेळ येऊ नये अशी प्रामाणिक अपेक्षा. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वरच्या पत्राची शेवटची ओळ अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरावी... आणि मुंबईकरांना अधिक सुरक्षित आयुष्य देणारी!



हेही वाचा

मुंबईत पाऊस ओसरला, कचरा मात्र साचला!




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा