Advertisement

मुंबईत पाऊस ओसरला, कचरा मात्र साचला!


मुंबईत पाऊस ओसरला, कचरा मात्र साचला!
SHARES

मुंबईत मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत झाले असले, तरी अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले पहायला मिळत आहेत. अनेक भागांमध्ये साठलेला कचरा गुरुवारीही उचलला गेला नव्हता. मुंबईच्या रस्त्यांवर दीड ते दोन हजार मेट्रीक टन कचरा पडून असून यामुळे ठिकठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले पहायला मिळत आहे.


५ हजार मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट

मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसाची बरसात होऊन संपूर्ण मुंबईच पाण्याखाली गेली. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीच पाणी साचून संपूर्ण मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. परंतु बुधवारी महापालिकेच्या वतीने वाहून आलेला कचरा तसेच इतर कचरा साफसफाई करून त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेण्यात आले. बुधवारी दुपारपर्यंतच पाच हजार मेट्रीक टन एवढ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.



आरोग्यच बिघडवलं जातंय

बुधवारी कचरा साफसफाईचे काम हाती घेऊनही गुरुवारी अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत होते. दादर पश्चिम भागातच स्थानकाशेजारी रानडे मार्गावर, तसेच डिसिल्व्हा रोड, छबिलदास मार्ग, सेनापती बापट मार्ग, बाळ गोविंददास मार्ग आदी ठिकाणी हे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. अशाच प्रकारे मुंबईतील वरळी, लोअर परळ, घाटकोपर, कुर्ला, कांदिवली, मालाड, वांद्रे, गोरेगाव, भांडुप आदी ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले असून हा कचराच उचलला गेलेला नाही. त्यामुळे एका बाजूला महापालिका आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करत आहे, तर दुसरीकडे कचराच न उचलून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडवत असल्याचे दिसत आहे.


९ हजार मेट्रीक टन उचलण्यासाठी गाड्या तयार

घनकचरा विभागाचे उपायुक्त विजय बालमवार यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी कचरा उचलण्याचे योग्य नियोजन करून आवश्यकतेनुसार प्रत्येक वॉर्डात गाड्याही पुरवण्यात आल्या आहेत, असे सांगितले. बुधवारी सुमारे ९ हजार मेट्रीक टन कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जायला हवा, असेच अनुमान लावून त्याप्रमाणे गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु डम्पिंग ग्राऊंडवर केवळ साडेसात हजार मेट्रीक टन कचराच जाऊ शकला. बाकीची वाहने रिकामी गेली, असे त्यांनी सांगितले. परंतु, जास्तीत जास्त कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम महापालिकेने युद्धपातळीवर घेतले असून ज्याप्रमाणे कचऱ्याच्या तक्रारी येत आहेत, तिथेही गाड्या पुरवून तो कचरा उचलण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



हेही वाचा

तुफानातही डगमगला नाही मुंबईकर!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा