Advertisement

मुसळधार पावसामुळे मुंबईची 'बत्ती गुल'


मुसळधार पावसामुळे मुंबईची 'बत्ती गुल'
SHARES

मुंबईतल्या अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. अनेक भागांमधील वीजेचा पुरवठा खंडित करण्यात आला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून धारावीसह वडाळा, दादर, परळ तसेच अपोलो मिल कंपाऊंड आणि नेपियन्सी रोडवरील काही भागातील विद्युत पुरवठा तातपुरता खंडित करण्यात आला आहे.

धारावीतील नाईक नगर, शीव हॉस्पीटल, शीव कोळीवाडा, धारावी विभागातील उत्तर भाग, माटुंगा रेल्वे स्थानका शेजारी कमलारामन नगर तसेच परेल नाका, सुपारी बाग, दादासाहेब फाळके रोड, डिलाईट रोड या भागाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तसेच आवश्यकता वाटल्यास आणखी काही भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात येईल, असेही बेस्टच्या जनसंपर्क विभागाने जाहीर केले आहे. आपत्कालिन परिस्थिती नियंत्रणात येताच या ठिकाणचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर उपनगरात अंधेरी, खार, कांदिवली, कुर्ला, वांद्रे, घाटकोपर, मुलुंड आदी भागांमधीलही विद्युत पुरवठा रिलायन्स एनर्जी आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्यावतीने खंडित करण्यात आला होता.

पोलिसांचे आवाहन

आज म्हणजेच मंगळवारी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईतील सर्व पोलिस उपायुक्त, सह पोलिस उपायुक्त, सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दर्जाचे अधिकारी हे रस्त्यावर उतरून सतर्क गस्त राखत आहेत. तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांचे अधिकारी आणि अंमलदार हे रस्त्यावर तैनात आहेत. मुंबईत ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार झाल्याने वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार हे नागरिकांना मदत करीत आहेत. तसेच वाहतूक डायव्हर्ट करीत आहेत. तरी कोणालाही मदत हवी असल्यास त्यांनी 100 नंबरवर दूरध्वनी द्वारे किंवा 7738133133 / 7738144144 या क्रमांकावर मेसेज आणि ट्वीटरवर संपर्क साधता येऊ शकतो. तसेच मुंबई पोलिस कंट्रोल रूम हे 5000 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहेत. मुंबई पोलीस कंट्रोल टीम आणि संपूर्ण मुंबई पोलीस दल आयुक्त पडसळगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे.

आयुक्तांसह सर्व अधिकारी रस्त्यांवर
मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजिवन विस्कळीत झाल्यानतंर महापालिका आयुक्त अजोय मेहत यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह सर्व अधिकारी रस्त्यांवर उतरले आहे. मुंबईत पाचव्या दिवसाचे गणपतीचे विसर्जन असले तरी मुंबईकरांचे विस्कळीत झालेले जनजिवन सुरळीत करण्यासाठी हे सर्व अधिकारी कार्यरत होते. प्रत्येक विभागांमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर हे सर्व अधिकारी रस्त्यांवर उतरून लक्ष ठेवून होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा