टेट्रा पॅकचे 'कागदी' फर्निचर !

टेट्रा पॅकचे 'कागदी' फर्निचर !
टेट्रा पॅकचे 'कागदी' फर्निचर !
टेट्रा पॅकचे 'कागदी' फर्निचर !
टेट्रा पॅकचे 'कागदी' फर्निचर !
See all
मुंबई  -  

टेट्रा पॅकमध्ये मिळणारे ज्यूस, दूध, ताक, लस्सी हे काही आता नवीन राहिलेले नाहीत. कधीही आणि कुठेही घेऊन जाता येण्याजोगे, टिकाऊ असे टेट्रा पॅक हल्ली अनेकांच्या घरात असतातच. पण हे टेट्रा पॅक रिकामे झाले की त्याचे तुम्ही काय करता? तुम्ही म्हणाल, 'हा काय प्रश्न झाला का? साधा जाड पुठ्ठ्याचा खोका तो. कचराच झाला ना. मग तो टाकूनच देणार'. अर्ध्याहून अधिक मुंबईकरांच्या मनात हेच आले असेल.

पण आपल्या रोजच्या परिचयातल्या या टेट्रा पॅकचा वापर चक्क फर्निचर बनवण्यासाठी होतो! तुम्हाला जर विश्वास बसत नसेल, तर एकदा कुलाब्यातल्या सागर उपवन गार्डनला नक्की भेट द्या. सागर उपवन गार्डनमध्ये टेट्रा पॅकपासून बनवण्यात आलेले चार बेंचेस लावण्यात आले आहेत. गार्डनमध्ये हे बेंचेस लावण्यासाठी कुलाबा परिसरात राहणाऱ्या रेणू कपूर यांनी पुढाकार घेतला आहे.

 


मोनीषाने सुरू केलेला उपक्रम खरे तर खूप कौतुकास्पद आहे. या उपक्रमाबाबत माहिती मिळताच मी त्यांच्या प्रशिक्षण शिबिराला हजेरी लावली. त्यावेळी मोनीषा टाकाऊ साहित्यापासून ज्वेलरी कशी बनवायची याचे प्रशिक्षण शिबीर घेत होत्या. या शिबिरात मी हजेरी लावली. त्यांनी मला शिबिरात पेपरशीट दिले. ते पेपरशीट टेट्रा पॅकपासून बनले होते हे कळल्यावर मी आश्चर्यचकित झाले. मी सुद्धा त्यांच्या या कामात हातभार लावायचे ठरवले. त्यानुसार माझ्या सोसायटीत शिबीर आयोजित केले. रहिवाशांना समजवले आणि हे टेट्रा पॅक जमा करण्यासाठी एक बॉक्स सोसायटीत लावला. तीन वर्षांत त्यात जवळपास १४ हजार टेट्रा पॅक जमा झाले होते. याच टेट्रा पॅकपासून बनवलेले चार बेंच सागर उपवन गार्डनला देणगी म्हणून देण्यात आले.

रेणू कपूर, रहिवासी, कुलाबा    

मुंबईत जमणाऱ्या हजारो टन कचऱ्यामुळे डंपिंग ग्राऊंड अक्षरश: भरला आहे. कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याच कचऱ्यातल्या काही वस्तू उदाहरणार्थ इलेक्ट्रिक सामग्री, कपडे, प्लॅस्टिक, कागद, पुठ्ठे आदी रिसायकल करता येऊ शकतात. हेच कचऱ्याचे ढिग पाहून 'आरयूआर' म्हणजेच 'आर यू रिड्युसिंग, रियुजिंग अँड रिसायकलिंग' या मुंबईतल्या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला. टेट्रा पॅकपासून बेंचेस, स्कूल डेस्क आणि इतर फर्निचर बनवण्याची संकल्पना 'आरयूआर'च्या संस्थापिका मोनीषा नरके यांना सुचली. मोनीषा यांनी त्वरित 'टेट्रा पॅक' या कंपनीच्या भारतातील शाखेशी संपर्क साधला. 'टेट्रा पॅक' कंपनीला ही अभिनव संकल्पना खूपच आवडली. कंपनीने सहकार्य देण्याचे मंजूर केले. त्यानंतर 'गो ग्रीन' ही संकल्पना सुरू झाली. पर्यावरण वाचवण्यासाठी 'आरयूआर' करत असलेल्या प्रयत्नांची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्येही नोंद झाली आहे.


कचऱ्याचा पुनर्वापर कसा करता येईल यावर मी अभ्यास केला. तेव्हा कचऱ्यात वाया जाणाऱ्या टेट्रा पॅककडे माझे लक्ष गेले. टेट्रा पॅक हे पूर्णपणे रिसायकल करता येतात. सो आम्ही टेट्रा पॅकपासून बेंचेस, स्कूल डेस्क बनवण्याचा निर्णय घेतला. पण लोकांकडून हे पॅक कसे गोळा करायचे हे मोठे आव्हान आमच्यापुढे होते. त्यामुळे मी माहिम म्हणजेच माझ्या सोसायटीतून याची सुरुवात केली. आता लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व जमलेले टेट्रापॅक पालघरमध्ये पाठवले जातात. तिकडे टेट्रा पॅकवर प्रक्रिया करून त्यापासून बेंच आणि स्कूल डेस्क बनवले जातात.

मोनीषा नरके, संस्थापिका, आरयूआर

मोनीषा यांच्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून 'सहकारी भंडार' आणि 'रिलायन्स फ्रेश' देखील या मोहिमेत सहभागी झाले. सहकारी भंडार यांच्या एकूण ५५ दुकानांमध्ये टेट्रा पॅक जमा करण्यासाठी बॉक्स ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून ग्राहक रिकामे टेट्रा पॅक यात जमा करू शकतील.सात-आठ वर्षांपूर्वी आम्ही ही संकल्पना राबवायला सुरुवात केली. सुरुवातीला 100 टेट्रा पॅक जमा व्हायचे. आता ती संख्या लाखोंच्या घरात आहे. जवळपास 30 शाळांमध्ये टेट्रापॅकपासून बनवलेले स्कूल डेस्क आम्ही दान केले आहेत. टेट्रापॅकपासून तुम्ही फक्त फर्निचर नाही, तर नोटबुक, पेपर रोल अशा वस्तूही बनवू शकता. सहकारी भंडार इथे जमलेले टेट्रा पॅक हे बचत गटाच्या महिला पालघरमध्ये पोहोचवण्याचे काम करतात. त्यामुळे या महिलांचीही थोडीफार कमाई होते. पण हे सर्व आरयूआरच्या पाठिंब्याशिवाय शक्य नव्हते.

विनय अध्ये, बिजनेस हेड

'डिलक्स रिसायकलिंग' ही पुनर्उत्पादनाच्या क्षेत्रात असणारी कंपनी बेंच बनवून देण्याचे काम पाहते. या कंपनीचे मालक जिग्नेश शाह यांच्या पालघरमधल्या कंपनीत टेट्रा पॅकपासून बेंच, डेस्क आणि फर्निचरसाठी आवश्यक असे साहित्य बनवले जाते.


कसे बनवले जाते टेट्रा पॅकपासून फर्निचर?दोन-दोन दिवसांनी आमच्याकडे जवळपास लाखो टेट्रा पॅक कार्टन्स जमा होतात. हे टेट्रापॅक कार्टन्स आमच्या ग्राइंडिंग मशिन्समध्ये बारीक केले जातात. बारीक म्हणजे अगदी त्यांचा भुगा केला जातो. त्यानंतर प्रेस सेक्शनमध्ये एका स्टिलच्या शिटवर भुगा पसरवण्यात येतो. पुढे या शिट हॉट प्रेसमध्ये टाकल्या जातात. एकावेळी 7-8 शिट हॉटप्रेसमध्ये टाकल्या जातात. हॉटप्रेसमध्ये उच्च तापमानावर त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते. हॉटप्रेसमधून ते कोल्डप्रेसमध्ये नेण्यात येते. त्यानंतर ठरलेल्या मापानुसार त्यांचे कटिंग होते. त्यानंतर त्याचे बेंच आणि स्कूल डेस्क असे फर्निचर बनवले जाते.

आशिष शाह, संचालक, डिलक्स रिसायकलिंग

टेट्रा पॅकपासून बनवलेले डेस्क मुंबईतल्या अनेक शाळांना देणगी म्हणून देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत २००-२५० स्कूल डेस्क देणगी म्हणून देण्यात आले आहेत. शाळा आणि सोसायटींमध्ये 'आरयूआर'तर्फे वर्कशॉप आयोजित केली जातात. अनेक शांळांमध्ये त्यांनी टेट्रा पॅक जमा करण्यासाठी बॉक्स देखील ठेवले आहेत. काही सोसायट्यांमध्ये हे बॉक्स ठेवण्यात आले आहेत. ज्या सोसायटींमध्ये बॉक्सची व्यवस्था नाही, असे रहिवासी जवळच्या सहकारी भंडार इथे हे टेट्रा पॅक जमा करतात.


मुंबईत खूप कचरा झाला आहे. त्यामुळे आरयूआरने सुरू केलेली संकल्पना खूप चांगली आहे. माझा या संकल्पनेला पूर्ण पाठिंबा आहे. मी माझ्या सोसायटीतून, मित्रांकडून शिवाय शाळेतूनही टेट्रा पॅक जमा करतो. दर शनिवारी मी जमा करतो आणि सहकारी भंडारमध्ये येऊन देतो.

-प्रणय जोशी, मुंबईकर


टेट्रा पॅकपासून बनवण्यात आलेल्या फर्निचरची वैशिष्ट्ये


  • या बेंचेसची किंवा स्कूल डेस्कची जास्त देखभाल करावी लागत नाही


  • यामध्ये प्लॅस्टिकचा वापर केला जातो. त्यामुळे पाण्यापासून त्याचे संरक्षण होण्यास मदत होते


  • याला पॉलिश करण्याचीही गरज नाही


  • प्लॅस्टिकचा वापर असल्याने ते खूप वर्षे टिकते


मुंबईत दिवसेंदिवस कचरा वाढत आहे, असे बोलून आपण नाकावर रुमाल ठेवतो. पण किती मुंबईकर पुढाकार घेऊन हा कचरा साफ करतात? अर्ध्याहून अधिक मुंबईकर निरुत्तर असतील. पण अजून वेळ गेलेली नाही. 'जब जागो तब सबेरा' असे म्हणत चांगल्या कामाचा शुभारंभ करा!


टेट्रा पॅक जमा करण्यासाठी काही टिप्स


  • टेट्रा पॅक जमा करताना त्याला पूर्णपणे मोडून आणि स्वच्छ करून टाकावा


  • एका बेंचसाठी २००० ते २५०० टेट्रा पॅक आवश्यक


  • एका स्कूल डेस्कसाठी ६൦൦൦ ते ६५०० टेट्रा पॅक लागतातहेही वाचा

प्लॅस्टिक बॉटल रिसायकल मशीनमधून 2 महिन्यात 6 टन प्लॅस्टिक जमा


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.