Advertisement

वरळीच्या शिवालय सोसायटीत कचऱ्यापासून खत निर्मिती


वरळीच्या शिवालय सोसायटीत कचऱ्यापासून खत निर्मिती
SHARES

वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे सोयींप्रमाणेच समस्या देखील निर्माण होत आहेत. या समस्यांमध्ये अत्यंत गंभीर असलेली एक समस्या म्हणजे घरातून निघणारा रोजचा कचरा. त्याची विल्हेवाट कशी लावावी यासाठी पालिकेचे नियोजन हा खूप गंभीर प्रश्न आहे. मुंबई शहरात अनेक नव्याने निर्माण झालेल्या सोसायट्यांमध्ये राहणारे सुशिक्षित नागरिक यावर अभ्यास करून नवनवीन प्रयोग करत त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळत आहे.

गतवर्षी मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभागातील महापालिका कार्यालयाच्या कॅंटीनमध्ये लागणाऱ्या गॅससाठी टाकाऊ कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर छोट्यामोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी सौर उर्जा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे पावसाच्या पाण्याचा वापर कसा करता येईल यासाठी देखील प्रयोग करण्यात आले.

1 मे 2017 पासून वरळीच्या शिवालय सोसायटीमध्ये देखील कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रयोग करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी देखील झाला आहे. हा पर्यावरण पूरक उपक्रम सुरू करण्यासाठी या सोसायटीतील सर्वच रहिवाशांची मदत झाली. परंतु शिवालय सोसायटीचे सेक्रेटरी नितीन आडीवडेकर यांची ही मुख्य संकल्पना आहे. दिवाळीपर्यंत या सोसायटीमध्ये सोलर योजना देखील आणण्याचा त्यांचा मानस आहे.

1 मे रोजी विभागातील नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी या प्रकल्पाला आपला हातभार लागावा यासाठी सोसायटीतील रहिवाशांना कचरा टाकण्यासाठी नगरसेवक निधीतून डब्यांचे वाटप केले. शिवालय सोसायटी ही एसआरएची एकमेव अशी सोसायटी आहे. ज्यामध्ये असे वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. या सोसायटीला स्वतंत्र अशी बोअरवेल आहे. पावसाच्या पाण्याचे रिसायकल करून वापरण्याकरता सोसायटीला महापालिकेकडून अधिकृत परवाना देखील देण्यात आला आहे. या कचऱ्यापासून खतनिर्मिती केल्यानंतर या प्रयोगादरम्यान सोसायटीच्या गच्चीत फुल-झाडांची सुंदर बाग फुलली आहे. प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी येणाऱ्या अनेकांचे लक्ष सध्या ही झाडे वेधून घेत आहेत.

कचऱ्याची विल्हेवाट कशी करायची? हा सध्याच्या काळात सर्वात मोठा प्रश्न आहे. आजूबाजूच्या सर्व सोसायटींनी हा प्रयोग केला, तर डम्पिंग ग्राऊंडचा मुद्दाच राहणार नाही आणि प्रदूषणाला देखील आळा बसेल. सध्या प्रोजेक्टसाठी लागणारे ड्रम हे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ असे तयार करण्यात आले आहेत. या सर्व वस्तूंपासून प्रकल्पाला आवश्यक त्या सर्व बाबींसाठी सोसायटीचे अध्यक्ष वसंत देवरे यांनी मदत केली आहे.

- राकेश मनसुख, शिवालय सोसायटीचे सदस्य

25 दिवसांत या ठिकाणी 50 किलो खत निर्मिती होते. सध्या हे खत सोसायटीच्या गार्डनसाठी वापरले जाते. त्यांच्या झाडांना हे खत भविष्यात गरजेप्रमाणे दिले जाईल. या खतामध्ये कोणतेही रसायन मिसळलेले नाही.

- विशाल लोकरे, शिवालय सोसायटीचे सदस्य

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा