Advertisement

ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हेमोडायलिसिसची सुविधा


ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हेमोडायलिसिसची सुविधा
SHARES

जोगेश्वरी इथल्या ट्रॉमा केअर रुग्णालयात लवकरच हेमोडायलिसिस केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मूत्रपिंडाचा विकार असलेल्या रुग्णांना आठवड्यातून तीनदा डायलिसिस करावं लागतं. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना या सुविधेचा फायदा होणार आहे. खासगी रुग्णालयात या डायलिसिसचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. त्यामुळे या ट्रॉमा केअरमध्ये येणाऱ्या रुग्णांना कमी खर्चात डायलिसिसवर उपचार घेता येणार आहेत. याविषयी ट्रॉमा केअर रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शशिकांत वाडेकर यांना विचारलं असता लवकरच डायलिसिसची सुविधा आम्ही सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘तसंच यासाठी एक जागा घेण्यात आली. ज्यात डायलिसिसच्या 10 मशीन्स ठेवल्या जाणार आहेत. याविषयीचा प्रस्ताव आम्ही आमच्या वरिष्ठांकडे पाठवणार आहोत. त्यानंतरच सर्व प्रक्रिया सुरू होणार आहे, असं सांगण्यात आलं. दुसऱ्या रुग्णालयांप्रमाणे या रुग्णालयातही रीतसर प्रकल्प राबवण्यात येणार आहे. खासगी आणि सार्वजनिक असा संयुक्तपणे हा प्रकल्प राबवला जाणार आहे.या रुग्णालयात हेमोडायलिसिसची सुविधा नसल्याची तक्रार जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर ट्रॉमा केअर रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शशिकांत वाडेकर यांच्याशी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत रुग्णालयात उपलब्ध नसणाऱ्या सोयी-सुविधा याविषयी चर्चा करण्यात आली. तसंच सुरू करण्यात येणाऱ्या हेमोडायलिसिस या केंद्राविषयीही चर्चा करण्यात आली. पण, अजूनही हे केंद्र का सुरू केलं गेलं नाही याबाबत विचारणा केली असता लवकरच हे केंद्र सुरू करणार असल्याचं रुग्णालयातर्फे सांगण्यात आलं. रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयात सोनोग्राफी मशीनही उपलब्ध नाही असा प्रश्न विचारला असता वाडेकर यांनी रुग्णालयात सर्व मशिनरी उपलब्ध असल्याचा दावा केला. रुग्णालयात सोनोग्राफी, आयसीयू, एक्स-रे मशीन, सीटीस्कॅन असे बरेच डिपार्टमेंट असल्याचंही वाडेकर यांनी सांगितलं. त्यामुळे इकडे येणाऱ्या रुग्णांना अन्य रुग्णालयांप्रमाणे फायदा होणार असल्याचं वाडेकर यांनी स्पष्ट केलं. पण, प्राथमिक मशिन्सही उपलब्ध नसलेल्या रुग्णालयात हेमोडायलिसिससारखा एवढा मोठा प्रकल्प राबवून रुग्णांना खरंच फायदा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय आहे हेमोडायलिसिस –
मूत्रपिंडासारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या शरीरात वारंवार रक्ताचं शुद्धीकरण केलं जातं. ज्या रुग्णांची किडनी निकामी होते, त्यांचं बाहेरुन रक्त शुद्धीकरण करावं लागतं.

यासाठी करतात हेमोडायलिसिस -

  • शरीरातील अतिरिक्त क्षार, उत्सर्जित द्रव्ये काढून टाकण्यासाठी

  • अतिरिक्त रसायने, रक्तातील वाढलेले द्रव्य काढून टाकण्यासाठी

डायलिसिस करण्यासाठी एव्ही पिस्तुला ही वैद्यकीय प्रक्रिया केली जाते. ही एक छोटीशी शस्त्रक्रिया हातावर केली जाते. त्यामार्गे डायलिसिस केले जाते. पेशंटच्या नसा व्यवस्थित नसतील तर कॅथेटर टाकले जातात.

किती वेळा करावे लागते?

  • डायलिसिस हे आठवड्यातून तीनदा करावे लागते. प्रत्येकी चार तासांची ही प्रक्रिया आहे.

  • किडनी निकामी झालेल्या रुग्णांसाठी ही वैद्यकीय प्रक्रिया आहे.

Read this story in English
संबंधित विषय