Advertisement

पावसाळा आला, आजारांपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी!


पावसाळा आला, आजारांपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी!
SHARES

कधी कडक ऊन, कधी पाऊस, असे विचित्र वातावरण सध्या मुंबईकरांना अनुभवायला मिळत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे, तसेच जंतूसंसर्गामुळे उद्भवणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकला, ताप असे व्हायरल आजार पसरत आहेत. त्यामुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातही सर्वाधिक रुग्ण हे थंडी तापाचे, खोकल्याचे असल्याचे आढळून आले आहे. तसेच या आजारांसह टायफॉईड, मलेरियाचे रुग्ण आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

व्हायरल इन्फेक्शन सध्याच्या वातावरणात वाढण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: ची काळजी घ्यावी. तसेच पालिका रुग्णालयात अजूनही तापाचे रुग्ण येत नाहीत. पण, पावसाळा सुरू झाल्याने या कालावधीत रुग्णांची संख्या वाढू शकते. यामुळे प्रमुख तीन पालिका रुग्णालयांसह 16 उपनगरीय रुग्णालयात 2800 खाटा राखीव ठेवल्या आहेत.

डॉ. अविनाश सुपे, वैद्यकीय संचालक, पालिका रुग्णालय


हेही वाचा - 

मुंबईकरांनो, पावसाळ्यात आजारांपासून सावध रहा!

पावसाळी आजारांवर उपचारासाठी महापालिका रुग्णालये सज्ज


यावर्षी उन्हाळ्यात गरमीने मुंबईकरांची लाहीलाही झाली होती. पावसाचा महिना सुरू होऊनही हवा तसा पाऊस कुठेच झालेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना मध्येच थंडी आणि मध्येच अंगाला चटके देणारे ऊन आणि घामाला सामोरे जावे लागत आहे. यामुळेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य ताप येत आहे. दररोज दवाखान्यात 7 ते 8 रुग्ण तापाचे येतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण, हे व्हायरल इन्फेक्शन असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. तसेच, पावसाळ्यात रस्त्यात, गल्लीत साचणारे पाणी यामुळे शरीरावर खाज येते, असे रुग्ण देखील येतात. रस्त्यावरील नियमित न उचलला जाणारा कचरा यामुळे मलेरियाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे, असे फिजिशियन डॉ. गोविंद केवट यांनी सांगितले.

हवेतील आर्द्रता वाढली असून, व्हायरल इन्फेक्शन पसरवणाऱ्या जंतूंचा संसर्ग या हवेत मोठ्या प्रमाणात वाढतो. या इन्फेक्शनचा सर्वात जास्त त्रास हा लहान मुलांना, गर्भवती महिला, वयोवृद्ध यांना होत आहे. लहान मुलांमध्ये ताप, उलट्या, सर्दी, खोकला ही या व्हायरल तापाची लक्षणे आहेत. ताप येतो-जातो, भूक कमी होणे, अंग दुखणे, घसा दुखणे, डोळे दुखणे आणि हातापायाचे सांधे दुखणे ही लक्षणे देखील दिसून येतात. त्यामुळे पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देतात.

व्हायरल तापापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्याल -

  • सर्वात प्रथम अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा
  • पाणी उकळून प्या
  • गरमीपासून वाचण्यासाठी थंड पाण्याचा मारा सतत करू नका
  • गर्दीच्या ठिकाणी जास्त फिरू नका
  • जमल्यास तोंडाला मास्क वापरा
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्या
संबंधित विषय
Advertisement