पावसाळी आजारांवर उपचारासाठी महापालिका रुग्णालये सज्ज

  Mumbai
  पावसाळी आजारांवर उपचारासाठी महापालिका रुग्णालये सज्ज
  मुंबई  -  

  मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावताच वातावरणातील बदल जाणवायला लागला अाहे. बदलत्या वातावरणात साथीचे आजार अत्यंत वेगाने पसरतात. पावसाळ्यात तर डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होते. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना वेळीच रोखण्यासाठी महापालिका रुग्णालयेही सज्ज झाली आहेत.

  पावसाळ्यात जागोजागी साचणाऱ्या पाण्यामुळे डासांच्या संख्येत वाढ होते. परिणामी डेंग्यू, मलेरिया, कॉलरा आणि चिकनगुनिया यांसारखे साथीचे आजार पसरतात. त्यामुळे पालिका हद्दीतील परिसरात साथीच्या आजारांबाबत जनजागृती करून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

  डेंग्यू हा रोग 'एडिस इजिप्ती' या डासांमुळे होतो. हे डास स्वच्छ पाण्यात अंडी देतात. या डासांच्या अळ्यांचे निर्मूलन करण्यासाठी पालिकेकडून मुंबईतील तब्बल 33 लाख 30 हजार घरांची तपासणी करण्यात आली आहे. लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी 80 हजारांहून अधिक उंदीर मारण्यात आले आहेत. तर, स्वच्छता न राखणाऱ्या 321 तबेला मालकांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

  -  डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी वैद्यकीय अधिकारी, मुंबई महानगरपालिका

  2016 मध्ये डेंग्यूचे 1,180 रुग्ण आढळले होते. यावर्षी जानेवारी महिन्यापासून 116 रुग्णांची पालिकेच्या विविध रुग्णालयांत नोंद झाली आहे. तर, फक्त मे महिन्यात डेंग्यूच्या 31 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. इतकेच नव्हे, तर स्वाइन फ्लूचेही यंदाच्या वर्षी 37 नवीन रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत संपूर्ण मुंबईत सात जणांना जीव गमवावा लागला आहे.

  महापालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयांसह 16 उपनगरीय रुग्णालयांत 2,800 खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णांच्या सेवेत कुठलाही खंड पडू नये, यासाठी डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफसह 3 हजारांहून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

  अशी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी -
  - पावसाळ्यात नेहमी उकळलेले पाणीच मुलांना प्यायला द्यावे
  - दिवसातून जास्तीत जास्त वेळा पाणी पिणे गरजेचे आहे
  - घरातील किंवा घराबाहेरील पाणी साठवलेली सर्व भांडी रिकामी करुन एकदा कोरडी करावीत
  - मोठ्या टाक्यांना घट्ट झाकण बसवावे
  - फ्लॉवर पॉट, कुलर, फ्रीजखालच्या ट्रे मधील पाणी दर आठवड्याला रिकामे करावे
  - गच्चीवरील भंगार मालाची विल्हेवाट लावावी
  - घराभोवती असलेली पाण्याची डबकी बुजवावीत
  - डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करा

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.