Advertisement

हुतात्मा करपैया चौथऱ्याला कचऱ्याचा विळखा


हुतात्मा करपैया चौथऱ्याला कचऱ्याचा विळखा
SHARES

शीव कोळीवाड्यातील मोनोरेलच्या गुरु तेग बहादूर नगर स्थानकाजवळ काही महिन्यांपूर्वीच हुतात्मा करपैय्या किरमल देवेंद्र चौथरा उभारण्यात आला आहे. या चौथऱ्याचा योग्य आदर राखणे गरजेचे असताना स्थानिकांनी अत्यंत बेपर्वाईने कचरा टाकून या चाैथऱ्याला अक्षरश: उकिरड्याचे रुप आणले आहे. चौथऱ्याला कचऱ्याचा विळखा पडल्याने येथे मोकाट गाई, कुत्र्यांचा वावरही वाढला आहे. स्थानिक नगरसेवकानेही या चौथऱ्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने पादचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या 105 जणांपैकी एक असलेल्या करपैय्या किरमल देवेंद्र यांच्या चौथऱ्याचे सुशोभिकरण करून 22 डिसेंबर 2016 रोजी काँग्रेसच्या माजी नगरसेविका ललिता यादव यांच्या हस्ते त्याचे उदघाटन करण्यात आले होते. शीव कोळीवाडा, म्हाडा चाळ, कोकरी आगार परिसरातील तामिळ भाषिकांनी या उद्घाटन प्रसंगी मोठी गर्दी केली होती. मात्र येथील रहिवाशांना या हुतात्म्यांचा विसर पडल्याचे दिसत आहे. तसे असल्यानेच येथील चौथऱ्याची अल्पवधीतच दुरवस्था झाली आहे. पादचाऱ्यांचा महापालिकेच्या ढिसाळ कारभारावरील रोष वाढत चालला आहे. परिसरात कचराकुंडी नसल्यानेच रहिवासी येथे सर्रासपणे कचरा टाकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे. चौथऱ्याच्या दुर्दशेला स्थानिक रहिवाशांइतकेच महापालिका प्रशासनही जबाबदार आहे. त्यामुळे प्रशासनाने येथे तात्काळ क्लिनअप मार्शलची नियुक्ती करून कचरा टाकण्यासाठी रहिवाशांना कचराकुंडी उपलब्ध करून द्यावी आणि या हुतात्म्याच्या चौथऱ्याला न्याय द्यावा, असे माजी नगरसेविका ललिता यादव यांनी सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा