Advertisement

अन्यथा पुन्हा कडक निर्बंध, मुख्यमंत्र्यांचा इशारा

कोरोना संबंधित निर्बंधांमधून मोकळीक देण्यात आलेली आहे. या मोकळीकीचा गैरफायदा उचलून कोरोनाचा फैलाव कुणीही करू नये.

अन्यथा पुन्हा कडक निर्बंध, मुख्यमंत्र्यांचा इशारा
SHARES

आपले दैनंदिन पोटापाण्याचे व्यवसाय सुरु राहावेत, अर्थचक्र थांबू नये म्हणून कोरोना संबंधित निर्बंधांमधून मोकळीक देण्यात आलेली आहे. या मोकळीकीचा गैरफायदा उचलून कोरोनाचा फैलाव कुणीही करू नये, अन्यथा कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एका निर्बंध कडक करावे लागू शकतात, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. 

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या  मुलांसाठीच्या कोविड काळजी केंद्राचं लोकार्पण करताना बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावं म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका. नागरिकांनी कोणत्याही चिथावणी आणि आमिषास बळी पडून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करून घेऊ नये. कोविड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकतं. कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. 

मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या लाटेच्या शेवटी सणवार आले होते. पण आता दुसरी लाट ओसरता ओसरता सण-उत्सवांची सुरुवात होते आहे. त्यात आपण गेल्या १५ दिवसांपासून निर्बंध शिथिल केले आहेत, पण ही मोकळीक आपले दैनंदिन पोटापाण्याचे व्यवसाय सुरु राहावेत, अर्थचक्र थांबू नये म्हणून आहे. आपल्याला संसर्ग आणि मृत्यू दर आणखी कमी करायचा आहे. त्यामुळे कोविड योद्धा होता आलं नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घ्या.

हेही वाचा- मासळी बाजार मुंबईत ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेवर बुधवारी मच्छीमारांचा मोर्चा

तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संर्गाचा धोका जास्त असल्याने राज्य शासनाने लहान मुलांसाठी कोविड टास्क फोर्स स्थापन केला आहे. मुंबईत आधुनिक अशी जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा  सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून आपल्याला संसर्गाविषयी शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित आणि त्वरेने माहिती मिळत राहील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘असं’ आहे लहान मुलांचं कोरोना काळजी केंद्र 

कलिना विद्यापीठ आय.टी. पार्क येथे उभारण्यात आलेलं लहान मुलांचं कोरोना काळजी केंद्र हे ५ हजार चौरस फुटांचं असून रुग्ण खाटांची संख्या ३० आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्रशस्त जागा आहे. हे केंद्र कोरोनाग्रस्त लहान मुलांना अलगीकरण व त्यांच्या उपचाराकरिता तयार करण्यात आलं आहे. 

याठिकाणी स्तनदा मातांना स्तनपानाकरिता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त मुलांसोबत पालकांनाही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये ऑक्सिजनयुक्त अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. या कोरोना काळजी केंद्रात २४ तास स्वच्छता व सुरक्षिततेसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुलांवर महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील व खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी लहान मुलांना पोषक आहार देण्यात येणार आहे. मुलांसाठी मनोरंजन उपक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या केंद्रात लहान मुलांना दवाखान्यात आल्यासारखे वाटू नये व आनंददायी वातावरण असावं असा प्रयत्न  करण्यात आला आहे. रंगीबेरंगी भिंती, वेगवेगळी खेळणी, कार्डबोर्डचे बेड्स, आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा