Advertisement

आयआयटी संकुलातील 'इतक्या' विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

गेल्या काही दिवसांपासून आयआयटी संकुलातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

आयआयटी संकुलातील 'इतक्या' विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा
SHARES

आयआयटी संकुलातील ७ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून आयआयटी संकुलातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, आता संकुलातील एकाच वसतिगृहातील ५ विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळं वसतिगृह प्रतिबंधित केले आहे. याव्यतिरिक्त प्राध्यापक आणि अन्य कर्मचाऱ्यांसह ६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे.

ऑक्टोबरपासून संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आयआयटीने हळूहळू वसतिगृहांसह संकुलातील वर्ग सुरू केले. रुग्णसंख्या कमी असल्यामुळे दर आठवड्यात आतापर्यंत १ किंवा २ रुग्ण आढळत होते. परंतु आता रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे.

डिसेंबर महिन्यात एकूण १३ जणांना बाधा

  • ५ ते ११ डिसेंबरमध्ये ३ जणांना बाधा झाल्याचं आढळलं. 
  • ११ ते १८ डिसेंबरमध्ये आणखी ७ जण बाधित असल्याचे आढळले.
  • १९ डिसेंबरला आणखी ३ जणांना बाधा झाली आहे.

या महिन्यात संकुलातील ७ विद्यार्थ्यांना बाधा झाली आहे. यातील एकाच वसतिगृहात राहणाऱ्या २ विद्यार्थ्यांना गेल्या आठवड्यात बाधा झाल्याचं समजले. यानंतर वसतिगृहातील त्यांच्या संपर्कातील विद्यार्थ्यांची तपासणी केली असता आणखी ३ जण बाधित असल्याचे रविवारी आढळले. 

महापालिकेच्या नियमानुसार संकुलातील वसतिगृह प्रतिबंधित केले आहे. बाधित झालेल्या सातही विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या विद्यार्थ्यांना सौम्य लक्षणे असून सर्वांची प्रकृतीही स्थिर आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

निर्बंधाचा इशारा विद्यार्थ्यांना संकुलाबाहेर जाण्यासाठी मनाई करण्यात आली होती, परंतु अलीकडेच ही बंधने काढून बाहेर जाण्याची आणि बाहेरून येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतरच काही दिवसांत हे विद्यार्थी बाधित झाल्याचे आढळले.

संकुलात वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुखपट्टीचा योग्य वापर करण्यासह विद्यार्थ्यांनी संकुलाबाहेर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन संस्थेच्या प्रशासनानं केलं आहे. तसंच विद्यार्थ्यांनी नियमांचे योग्य पालन न केल्यास पुन्हा निर्बंध घातले जातील, असा इशाराही प्रशासनानं दिला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा