Advertisement

विक्रोळीतून गर्भपाताच्या औषधांचा अवैध साठा जप्त


विक्रोळीतून गर्भपाताच्या औषधांचा अवैध साठा जप्त
SHARES

विक्रोळीतील रूबी डायग्नॉस्टिक सेंटरवर बुधवारी अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) ने छापा टाकला. यावेळी या नर्सिंग होममधून गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि शेड्यूल एच-1 मध्ये मोडणाऱ्या एमटीपी किटचा अवैध साठा जप्त करण्यात आला. एमटीपी किटच्या खरेदी-विक्रीचा कोणतंही रेकॉर्ड यावेळी आढळलं नाही. याठिकाणी 11 एमटीपी किट (न वापरलेले) आणि 15 एमटीपी किटची रिकामी पाकिटं (वापरलेले) आढळली. त्यानुसार एफडीने औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार या नर्सिंग होमविरोधात कारवाई सुरू केली अाहे. लवकरच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली आहे.

विक्रोळीतील रूबी डायग्नॉस्टिक सेंटरसंबंधीची गुप्त माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या सेंटरवर छापा टाकला. रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. डॉ. सविता चव्हाण, आयुर्वेदिक, एम. डी. या सेंटरच्या मालक असून त्या स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून तेथे काम करत असल्याचेही आढळून आलं. गर्भपातासाठीच्या एमटीपी किटचा साठा येथे आढळला. याची अधिक चौकशी केली असता बेकायदा एमटीपी किटचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आलं. यावेळी याच सेंटरमधील वेदांत औषधांच्या दुकानांत शेड्यूल एच-1 मधील 70 हजार रुपये किंमतीची औषधेही जप्त करण्यात आली. या औषधांचीही खरेदी-विक्री बिले नसल्यानं या औषधांच्या दुकानाविरोधातही कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. कांबळे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान म्हैसाळ गर्भपात प्रकरण ताजं असून राज्यात अनेक ठिकाणी स्त्रीभ्रूण हत्या, बेकायदा गर्भपात होत असल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे असताना मुंबईतील विक्रोळीत अशा प्रकारे गर्भपातासाठीच्या एमटीपी किटचा बेकायदा साठा सापडणं, एमटीपी किटच्या खरेदी-विक्रीची बिले नसणं आणि आयुर्वेदिक डॉक्टरांकडून एमटीपी किटचा वापर होणं, ही अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया जनआरोग्य चळवळीतील तज्ज्ञांकडून दिली जात आहे. भ्रूणहत्येसाठी ही औषधे वापरली जात असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा