‘महावितरण’च्या ग्राहकांचे मासिक वीज बिल किमान २०० रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोळसाटंचाई, त्यामुळे आयात करावा लागणारा कोळसा, त्यातून वाढलेला वीजनिर्मिती खर्च, बाहेरून खरेदी करावी लागलेली वीज, क्रॉस सबसिडीच्या रूपात मिळालेले कमी अनुदान अशा कारणांमुळे ‘महावितरण’चा वीज खरेदी खर्च खूप वाढला आहे.
वीज खरेदी खर्च वाढला की त्याच्या भरपाईपोटी इंधन आकार वसूल केला जातो. महावितरण जुलैपासून १.३५ रुपये प्रति युनिट इतका हा आकार वसूल करीत आहे. त्याची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. वरील खर्चानुसार हा आकार १.९० रुपये होऊ शकतो. इंधन समायोजन आकार न वाढविल्यास पुढील वर्षी वीज दरवाढ अटळ असेल, असे संबंधित सूत्रांनी सांगितले. या संदर्भात ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ठोस उत्तर दिले नाही.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात, या वर्षी एप्रिल-मेदरम्यान कोळसा उपलब्धता घटली, त्याच वेळी मागणी उच्चांकावर गेली होती. त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्येदेखील ‘महानिर्मिती’ला महागड्या कोळशाने वीजनिर्मिती करावी लागली. त्यामुळे महागड्या दराने ‘महावितरण’ला वीजविक्री करावी लागली आहे. याच प्रकारे खासगी औष्णिक वीज उत्पादकांनीही महागडी वीज ‘महावितरण’ला विकली.
महानिर्मिती सात औष्णिक वीज प्रकल्पांतील ३० संचांद्वारे वीजनिर्मिती करते. या संचांमधील वीज विक्रीचा जुलै महिन्यात किमान २.४६७ रुपये ते कमाल ४.९५७ रुपये प्रति युनिट असलेला दर ऑगस्ट महिन्यात किमान २.८३७ रुपये ते ५.४६७ रुपये प्रति युनिटवर पोहोचला.
या सर्व स्थितीमुळे कंपनीला सप्टेंबरअखेरपर्यंत ३४ हजार ८०६ कोटी रुपयांचा वीज खरेदी खर्च आला असून तो १३ टक्के अधिक असल्याचे ‘महावितरण’ने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला याआधीच कळविले आहे. ही सर्व वसुली ग्राहकांकडूनच होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा