डॉ. लहानेंच्या हातात झाडू

 Mumbai
डॉ. लहानेंच्या हातात झाडू
Mumbai  -  

एरवी हातात टॉर्च घेऊन रुग्णांचे डोळे तपासणारे डॉ. तात्याराव लहाने यांनी शनिवारी हातात चक्क झाडू घेतला. हे वाचून थोडे आश्चर्य वाटले ना. मात्र त्याला कारणही तसेच आहे. सर ज. जी. रुग्णालयात शनिवारी मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने सर. ज. जी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी हातात झाडू घेऊन रुग्णालयाची सफाई केली.

सर ज. जी. समूह रुग्णालयातील चारही संलग्नित रुग्णालयामध्ये ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून ही मोहीम दरवर्षी राबविण्यात येते, असे डॉ. लहाने यांनी यावेळी सांगितले. मान्सूनपूर्व स्वच्छता करण्याचे यंदाचे हे 7 वे वर्ष अाहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहिला पाहिजे, असे आपण मनापासून ठरवल्यास आपण आपला परिसर नक्कीच स्वच्छ ठेवू शकतो. आपण एखाद्या ठिकाणी जवळपास 8 तास काम करतो. त्या जागेची आपण स्वच्छता ठेऊ शकतो, असेही डॉ़. लहाने यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.

या मोहिमेत सर्व ज्येष्ठ प्राध्यापक, सर्व अध्यापक वर्ग, वैद्यकीय अधिक्षक, नर्सेस, निवासी डॉक्टर्स, शिकाऊ डॉक्टर्स आणि सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर बांधकाम विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. सर. ज. जी. समूह रुग्णालयात वेगवेगळ्या विभागात आणि कक्षात एकूण 35 पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात 50 जणांचा सहभाग होता आणि प्राध्यापक त्या पथकाचे समन्वयक म्हणून काम करत होते.

या स्वच्छता मोहिमेत रुग्णालयातील 7 ट्रक कचरा आणि डेब्रिज गोळा करून उचलण्यात आला. उर्वरित कचरा आणि डेब्रिज बांधकाम विभागामार्फत पुढील दोन दिवसात उचलण्यात येणार आहे. ही स्वच्छता करीत असताना संस्थेतील सर्व दुर्लक्षित भागांवर लक्ष केंद्रीत करुन अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. ज्यामुळे अशा ठिकाणी डासांची निर्मिती होणार नाही. तसंच स्वच्छतेबरोबर सर्व पाण्याच्या टाक्या देखील स्वच्छ करण्यात आल्या. नाल्यांची साफसफाई करण्यात आली. पावसाळ्यात चिखल साचू नये म्हणून आधीच त्या सखल भागाची पाहणी करुन त्या भागात दुरुस्तीचे देखील काम सुरू करण्यात आले आहे. दर 15 दिवसांनी सर. ज. जी. रुग्णालयात स्वच्छता अभियान त्या त्या विभागातर्फे राबवण्यात येते.

Loading Comments