Advertisement

मुंबईतील पिण्याचं पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षाही शुद्ध

मुंबईकरांना मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याची शुद्धता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी महापालिका करत असलेल्या प्रयत्नांना यश आलं असून सन २०१९-२० या कालावधीत पाण्याचा दर्जा आणि शुद्धतेत ९९.३४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे.

मुंबईतील पिण्याचं पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षाही शुद्ध
SHARES

मुंबईकरांना मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याची शुद्धता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी महापालिका करत असलेल्या प्रयत्नांना यश आलं असून सन २०१९-२० या कालावधीत पाण्याचा दर्जा आणि शुद्धतेत ९९.३४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई महापालिका पुरवठा करत असलेले पाणी हे खासगी बाटलीबंद कंपन्यांच्या पाण्यापेक्षाही शुद्ध आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानुसार, राष्ट्रीय पातळीवर याची दखल घेण्यात आली असून, भारतातील नामांकित अशा 'इंडियन वॉटर वर्क्स' असोसिएशनतर्फे यंदाच्या 'जल निर्मलता' या पुरस्काराने महापालिकेला गौरवण्यात आले आहे.

नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्यासाठी तंत्रज्ञान, कुशल प्रशासन आणि उच्च प्रतीच्या व्यवस्थापनाचा विचार या निकषांवर उतरणाऱ्या महापालिकांना इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनतर्फे पुरस्कार दिला जातो. सन २०१९-२० या वर्षाकरिता सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. उपायुक्त अजय राठोरे यांनी हा पुरस्कार हैदराबाद येथे नुकत्याच एका कार्यक्रमात स्वीकारला आहे.

पंतप्रधान जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्राहक व्यवहार मंत्रालयातर्फे देशातील २१ शहरांमध्ये नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने गोळा करून ते आयएस १०५००: २०१२ नुसार पाण्याच्या विविध ४७ मानकांकरिता तपासण्यात आले. मुंबईत वरळी, करी रोड, शिवडी, पश्चिम उपनगरात मालाड, कांदिवली, जोगेश्वरी; तसेच पूर्व उपनगरातील पवई, साकीनाका, घाटकोपर, चेंबूर येथील झोपडपट्टीच्या भागातून पाण्याचे नमुने गोळा करून तपासण्यात आले. त्यातील सर्व नमुने ४७ मानकांकरीता योग्य आढळले आहेत. याची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आली आहे.

शुद्ध पाणी

  • महापालिकेतर्फे दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याच्या पुरवठा नागरिकांना केला जातो.
  • सेवा जलाशय व जलवितरण व्यवस्थेत निवडक ३५८ ठिकाणे जल विभागाने पाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी निश्चित केली आहेत.
  • त्यापैकी आरोग्य व गुणनियंत्रण (जलकामे) विभागाकडून रोज ११० ते १३० ठिकाणाहून पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत 'मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक' (एमएफटी) या अद्ययावत व अचूक तंत्रज्ञानाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार तपासले जातात.
  • दादर येथील चाचणी प्रयोगशाळेला डिसेंबर २०२० मध्ये नॅशनल बोर्ड ऑफ लेबोरेटरीजचे नामांकन प्राप्त झाले आहे.

प्रयत्न काय केले?

  • सन २०१३-१४ ते सन २०१९-२० या कालावधीत पालिकेतर्फे जुन्या जीर्ण झालेल्या विविध व्यासाच्या २५० किमी लांबीच्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या.
  • १ लाख ७५ हजार ठिकाणच्या गळती शोधून दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत.
  • विविध ठिकाणी कामे सुरू असताना रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत ८९ हजार ९०८ सेवा जोडण्या बदलण्यात आल्या.
  • सन २०१२ ते २०१८ पर्यंत विविध जलद बोगद्यांचे काम पूर्ण करण्यात आले. हे काम जल अभियंता विभागातर्फे मागील पाच वर्षात करण्यात आले.
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा