Advertisement

गिरगाव चौपाटीवर अाता उभारणार जेट्टी


गिरगाव चौपाटीवर अाता उभारणार जेट्टी
SHARES

गिरगाव चौपाटीवर अाता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं जेट्टी उभारण्यात येणार अाहे. त्यासाठी गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्राची जागा सरकार ताब्यात घेणार अाहे. जेट्टी उभारण्यासाठी जमीन हस्तांतरीत करण्याकरिता मुंबई महापालिकेच्या सुधार समितीत प्रस्ताव अाला होता. त्याला मान्यता देण्याएेवजी हा प्रस्ताव समितीनं राखून ठेवला अाहे. जागेची प्रत्यक्ष पाहणी करूनच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे अध्यक्षांनी जाहीर करत भाजप सरकारचं स्वप्न मात्र लांबणीवर टाकलं अाहे.


मुंबई पोर्ट ट्रस्टचा मास्टर प्लान

पर्यटनाच्या दृष्टीनं मुंबई पोर्ट ट्रस्टनं मास्टर प्लान तयार केला असून त्यात गिरगाव चौपाटीवर धक्का (जेटी) बनवण्यात येणार अाहे. ही जेट्टी मरीन ड्राइव्ह या मार्गाला जोडण्यासाठी बिर्ला क्रीडा केंद्राची मोकळी जागा ताब्यात घेण्यात येणार अाहे. ही जागा प्रवाशांच्या येण्या-जाण्यासाठी, टर्मिनस इमारतीकरिता, प्रसाधनगृह, भांडारकक्ष तसेच उपहारगृह अाणि हाॅटेलसाठी वापरण्यात येणार अाहे.


प्रस्ताव निर्णयाविना राखून ठेवला

बिर्ला क्रीडा केंद्राची ६ हजार ४७२ चौरस मीटर इतकी जागा असून त्यातील २ हजार ७९१ चौरस मीटर जागेवर केंद्राचे कार्यालय, सभागृह, तालीम कक्ष उभारण्यात अाला अाहे. या जागेपैकी २ हजार ७९१ चौरस मीटरची जागा सरकार ताब्यात घेणार अाहे. ही जागा हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव अाला असता भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे, ज्योती अळवणी यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. परंतु शिवसेनेच्या सदस्यांनी या जागेची पाहणी करण्याची मागणी केल्यामुळे समिती अध्यक्ष बाळा नर यांनी हा प्रस्ताव निर्णयाविना राखून ठेवला.


‘ट्रान्सपोर्टशन झोन’चाही प्रस्ताव राखून ठेवला

शिवडीतील तब्बल १० हेक्टर जागेवर असलेले विशेष औद्योगिक वापराचे आरक्षण बदलून त्या जागेवर आता शिवडी इंटरचेंजकरिता ‘ट्रान्सपोर्टशन झोन’ म्हणून आरक्षण टाकण्यात येत आहे. सरकारने अशाप्रकारची सूचनाच जारी केली असून याबाबतचा प्रस्तावही महापालिकेच्या सुधार समितीने राखून ठेवला. हा प्रस्ताव पर्यटनाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा असल्यामुळे तो त्वरीत मंजूर करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केली. परंतु त्यांच्या मागणीला न जुमानता हा प्रस्तावच राखून ठेवला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा