
कल्याण-डोबिवली पालिकेने (Kalyan-Dombivli Municipal Corporation) पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून दर सोमवार आणि मंगळवारी 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. बारवी धरणातील पाणीसाठा मान्सून येईपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संभाव्य एल निनो (El Nino) परिणामामुळे यंदा मान्सून उशिरा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पुरेसा पाणीसाठा राखून ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार ही उपाययोजना करण्यात आली आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, दर सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या भागांमध्ये पूर्णतः पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात बारवे, नेतीवली, मोहिली आणि टिटवाळा येथील सर्व पंपिंग स्टेशन आणि जलशुद्धीकरण केंद्रे बंद ठेवली जाणार आहेत.
सध्या KDMC ला बारवीमधून दररोज सुमारे 347 दशलक्ष लिटर पाणी मिळते. याशिवाय MIDC आणि ग्रामीण भागांनाही स्वतंत्र पाणीपुरवठा केला जातो. वाढती लोकसंख्या आणि अनिश्चित पावसाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलस्रोतांवर मोठा ताण निर्माण झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेने नागरिकांना आगाऊ पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता वर्तवली आहे.
सध्या परिसरातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, काही भाग टँकरवर अवलंबून आहेत. विविध भागांतील पाणीटंचाई हाताळण्यासाठी KDMC दरवर्षी 11 कोटी रुपयांहून अधिक खर्च टँकरसाठी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा
