Advertisement

कल्याण-डोंबिवलीत शनिवार, रविवारी दुकाने बंद, व्यापारी उतरले रस्त्यावर

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापना शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी घेतला.

कल्याण-डोंबिवलीत शनिवार, रविवारी दुकाने बंद, व्यापारी उतरले रस्त्यावर
SHARES

कल्याण-डोंबिवली महापालिका (kalyan-dombivali municipal corporation) क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापना शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी घेतला.  या निर्णयावरून कल्याण आणि  डोंबिवलीतील काही व्यापाऱ्यांनी गोंधळ घालत प्रशासनाला जाब विचारला.

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी जाहीर केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परिस्थितीतीनुसार शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासन आता अधिक कठोर होताना दिसत आहे.

कल्याण-डोंबिवलीत दररोज सरासरी ८०० ते ९०० कोरोनाबाधित (coronavirus) रुग्ण आढळत असल्याने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, फेरीवाले पुढील आदेशापर्यंत दर शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तू, दूध, वर्तमानपत्रे, औषध दुकाने, रुग्णालये, गॅस पुरवठा, उद्वाहन दुरुस्ती, किराणा, पेट्रोल पंप अशा सेवांना निर्बंधांमधून वगळण्यात आलं आहे. तर भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने चालविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उपाहारगृहे, मद्यालये, पोळी-भाजी केंद्रे यांना घरपोच सेवेला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

हेही वाचा- सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात रविवारपासून नाईट कर्फ्यू लागू

शनिवार आणि रविवार हे व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे दिवस असतात. त्याच दिवशी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याने व्यापारी संतापले आहेत. व्यापाऱ्यांच्या विनंतीवरून १० दिवसांपूर्वी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ ही दुकानांची वेळ बदलून सकाळी १० ते रात्री ८ करण्यात आली आहे. त्यातच हा निर्णय घेण्यात आल्याने डोंबिवलीतील (dombivali) व्यापाऱ्यांनी केडीएमसीच्या विभागीय कार्यालयाजवळ एकत्र येत गोंधळ घातला व रास्ता रोकोही केला.

शनिवारी, रविवारी सुट्टीनिमित्त लोकं बाहेर पडत असल्याने गर्दी होऊ नये म्हणून दुकानं आणि फेरीवाले यांना या दोन्ही दिवशी बंदी घालण्यात आली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात आल्यावर पुन्हा फेरविचार केला जाईल. नाशिक, नागपूर या शहरात देखील असा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाला तेथील व्यापाऱ्यांनी पाठींबा दिला. त्याचप्रमाणे नागरीकांचं हित लक्षात घेऊन येथील व्यापाऱ्यांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावं, असं मत सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा- लोकलची गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के उपस्थितीचा बीएमसीचा आदेश

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा