Advertisement

गर्भ ... व ... ती ...!

अलिकडे सोशल मीडियावर लोक कमालीचे आक्रमक झाले आहेत. व्यक्त व्हायला हवंच पण सबुरीनं. केरळच्या माल्लपूर जिल्ह्यातल्या या घटनेने देश हादरला. फटाके मिश्रीत अननस पोटात तोंडात फुटल्याने गर्भवती हत्तीण सैरभर पळत होती.

गर्भ ... व ... ती ...!
SHARES

कोरोना विषाणूची आता तुम्हा आम्हाला सवय झालीय. त्याच्या सोबतच आता आपल्याला जगायचं आहे असं नेतेमंडळी सांगताहेत. ठीक आहे जगूया कोरोनासोबत आपण सगळे. देवाक काळजी...! आपलं एक बर असतं देवावर सगळं ढकलून देतो. तर लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद झालंय. सकाळी पेपर वाचायची सवय मोडून गेलीय. चहासोबत पेपर असायचा; आता मोबाईल असतो. आता सगळंकाही मोबाईलवर कळतं. उद्या भाजीचा टेम्पो येणार असल्याचा मेसेज व्हाट्सअपवर येतो. बाजूचे अण्णा अचानक रात्री उशिरा खाली उतरले होते. ते पण पहाटे कळतं. बरंच काही आता मोबाईलवर कळू लागलंय. 

झालंय असं की त्यामुळे मोबाईल आता कायम माझ्या हातात असतो. सध्या कामधंदे बंद झाल्याने दुसरं करणार काय? सतत मोबाईल बघत राहा, पाहत राहा, चाळत राहा, निरखत राहा. पूर्वी कुठेतरी वाचलं होतं. दोन व्यक्ती बरीच वर्ष एकत्र राहिल्याने पुढे त्या दोन्ही व्यक्ती सारख्याच दिसायला लागतात. मला त्याच गोष्टीची भीती वाटतेय. सतत मोबाईल डोळ्या, तोंडासमोर ठेवल्यामुळे माझा चेहरा उभट चौकोनी तर होणार नाही ना ..? भविष्यात तसं होईलसुद्धा त्या चायनावाल्यांचा भरोसा नाही. तसलं एखाद अॅप काढतीलसुद्धा. मग तुम्ही तुमचा चेहरा हवा तास घोळवू  वळवू शकाल. शक्कल आयनेमे देखनेकी जरुरत नाही. समोरचा एखादा सांगेलच की नाहीतर तुमच्या मोबाईलवर लाईक्स देईल. असो पुरे झाले हे मोबाईल पुराण. मोबाईलवर वाचलेल्या पाहिलेल्या दोन घटनांबद्दल बातम्यांबद्दल आता बोलणार आहे मी.  

पहिली बातमी नेमकी कुठल्या भागातली राज्यातली आता आठवत नाही. पण बातमी चांगली लक्षात राहिली. कुण्या एका हत्ती प्रेमीच्या निधनाची बातमी होती ती. अलिकडे फेसबुकवर कुणा एकट्याचा फोटो पाहिलं तर धडधडायला  होत. त्या फोटोखाली लिहिलेलं असतं, भावपूर्ण श्रद्धांजली. वाईट काळ चालू आहे सध्या. तर ती बातमी होती कुणी हत्तीप्रेमी गेल्याची. पण खरी बातमी पुढे होती. तो हत्तीप्रेमी गेल्यावर दुसऱ्या दिवशी एक हत्तीचा कळप त्यांच्या अंगणात दाखल झाला. चार-पाच किलोमीटर अंतरावरून हा कळप पायपीट करत आला होता. सगळ्यांना नवल वाटलं. नवल याचं की या माणसाच्या निधनाची बातमी या हत्तींना कळली कशी.? दोन दिवस हा हात्तींचा कळप त्या घरासमोरच्या अंगणात बसून होता. काहीही न खाता; मग हा कळप निघून गेला. लोक तसंच नवलाने त्यांच्याकडे पाहत होते. तर अशी ती बातमी होती. हत्ती हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी असल्याचं आपण वाचलेलं असतं ऐकलेलं असत. आपण एखाद्या मित्राच्या निधनानंतर जसं त्याच्या घरी हाक द्यायला जातो. तसाच काहीसा हा या हत्तींचा प्रकार होता. नवल म्हणजे या कळपाचं नेतृत्व एका हत्तीणीने केलं होत. शिस्तबद्ध लाईनीत आले आणि लाईनीत ते निघून गेले. आता वळूयात दुसऱ्या बातमीकडे.

ही दुसरी बातमीही हत्तीणीची आहे. ही हत्तीण गेला आठवडाभर भारतात चर्चेचा विषय होती आणि आजही आहे. ही घटना आहे केरळची. तुम्हा आम्हा सगळ्यांना ठाऊक असलेली ही घटना आहे. सोशल मीडियावर, टीव्हीवर गाजलेली ही घटना आहे. कोरोना आणि निसर्ग वादळातही ही घटना गाजली. बातमीच तशी होती ना. या गर्भवती हत्तीणीला कुणी अननसाच्या आत फटाके भरून खायला दिले. त्यामुळे नंतर खाताना तिच्या तोंडात, पोटात स्फोट झाले. आधीच ती गर्भवती. या फटाक्यांमुळे ती गंभीर जखमी झाली. ती हत्तीण सैरभैर गावात धावू लागली. शेवटी तिने एका नदीपात्रात प्रवेश केला. पाण्यामुळे जखमेची दाहकता कमी होईल असं तिला वाटलं. तीन दिवस ती पाण्यात होती. तिसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. ही घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. साहजिकच आहे गर्भवती हत्तीणीचा हा मृत्यू काळीज हेलावून टाकणारा होता. एकच हाहाकार उडाला. काही वेळेसाठी लोक कोरोनाला विसरले. नेमकं काय झालं याची खात्री न करता लोक मानव किती नीच आहे यावर चर्चा करू लागले. घटना दुर्दैवी आहेच, पण त्या तपासाबद्दलही जाणून घायला हवं. असो.

अलिकडे सोशल मीडियावर लोक कमालीचे आक्रमक झाले आहेत. व्यक्त व्हायला हवंच पण सबुरीनं. केरळच्या माल्लपूर जिल्ह्यातल्या या घटनेने देश हादरला. फटाके मिश्रीत अननस पोटात तोंडात फुटल्याने गर्भवती हत्तीण सैरभर पळत होती. या जीवघेण्या धावपळीत तिने एकही माणसावर हल्ला केला नाही. पोटात होणाऱ्या वेदनेमुळे शेवटी या हत्तीणीने पाण्याचा आश्रय घेतला. दोन हत्तीच्या मदतीने तिला पाण्याबाहेर काढायचा प्रयत्न झाला. पण ही हत्तीण पाण्याबाहेर येत नव्हती. अखेर तिचा मृतदेहच बाहेर काढावा लागलं. ती गर्भवती होती हे तिचे शवविच्छेदन करताना डॉक्टरांना कळलं. या घटनेमुळे देशात काहूर उठलं. अनेक प्राणी संघटनेनी जोरदार आक्षेप घेतला. कोरोना आणि लॉकडाऊन नसता  तर देशभर निदर्शने ,आंदोलन झाली असती यात वादच नाही. विरोधही करायलाच हवा. सोशल मीडियाचा गैफायदा घेणारेही बरेच लोक आहेत. ते व्यक्त होतात आणि गायब होतात. पण पुढं काय? अशा प्रकरणांचा पुढे छडा लागतो काय ? अशा घटना नंतर पुढं आपण का विसरतो? जशी सरकारची जबाबदारी आहे तशी ती आपलीही आहे की नाही? फक्त चार ओळी लिहून आपण हात झटकणार का? का आपण सतत  राजकारणावरच गप्पा ठोकत असतो? त्यापलीकडं जग नाहीय का? आपल्या आजूबाजूला काहीच प्रश्न नाहीत का?  त्या हत्तीणीला फटाक्यांचा अननस भारावला गेला नव्हता. तिकडे केरळात शेताच डुक्करांकडून नुकसान होतं म्हणूनअसे फळांमध्ये फटाके भरून शेती वाचवली जाते.अश्या बातम्या आता येऊ लागल्यात. पण चुकून यात दुसऱ्या कुणाचा बळी जाऊ शकतो. याचीही त्यांनी काळजी घ्यायला नको होती का?  कोरोनानंतर जग बदलणार आहे असं आज म्हटलं जातंय. आता तरी आपण बदलणार आहोत की नाही ? 

काही दिवसांपूर्वी केरळमध्ये एका मुलीला पेपरला जाण्यासाठी स्थनिक सरकारने ७० आसनी बोट चालवल्याची बातमी आली होती खूप कौतुक झालं होतं या बातमीचं. पण याच केरळमध्ये लगेच दुसरी दुःखद बातमी आली. त्या गर्भवती हत्तीणीची बातमी वाचायला मिळावी यासारखं दुर्दैव ते काय?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा