Advertisement

मुंबईतील रस्ते एलईडी दिव्यांनी उजळणार


मुंबईतील रस्ते एलईडी दिव्यांनी उजळणार
SHARES

मरिन ड्राईव्ह येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावर एलईडी दिवे बसवण्यावरून वाद निर्माण झाला असला तरी हे दिवे संपूर्ण मुंबईतील रस्त्यांवर बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबईतील रस्ते उजळल्यानंतर उपनगरातही हे दिवे बसवले जाणार आहे. त्यामुळे येत्या मार्च महिन्यापर्यंत संपूर्ण मुंबईत ३० हजार ४४५ एलईडी दिवे बसवण्याचे टार्गेट प्रशासनाने दिले आहे.


जबाबदारी कुणाची

मुंबईतील रस्त्यांवर असलेल्या पथदिव्यांची उभारणी आणि देखभाल करण्याची जबाबदारी विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची आहे. शहरात बेस्ट, पूर्व आणि पश्चिम उपनगरात रिलायन्स एनर्जी आणि पूर्व उपनगरातील विद्याविहार ते मुलुंड आदी भागांमध्ये महावितरण या कंपन्या विद्युत पुरवठा करतात. मुंबईतील पथदिव्यांची जबाबदारी ही बेस्ट, रिलायन्स एनर्जी आणि महावितरण यांची असली तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी केवळ बेस्टतर्फे केली जात आहे. संपूर्ण मुंबईत सध्या सुमारे ६ हजार एलईडी पथदिवे बेस्टकडून बसवण्यात आले आहे. मात्र, रिलायन्स एनर्जी आणि महावितरण यांच्याकडून याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या रस्त्यांवरील दिव्यांच्या देखभालीची जबाबदारीही संबंधित कंपन्यांची असते. यासर्व विद्युत कंपन्या महापालिकेसाठी काम करतात. याचा देखभालीचा खर्च महापालिकेच्या माध्यमातून संबंधित विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दिला जातो.


निविदा न काढता दिवे बसवण्याचं टार्गेट

मात्र, मुंबईच्या रस्त्यांवरील दिवाबत्तीच्या खांबावर एलईडी पथदिवे बसवण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या धोरणानुसार केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतला. त्यानुसार महापालिका आयुक्तांना याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. एलईडी दिवे बसवण्याचे काम हे एनर्जी ईफिशियन्सी सर्विस या कंपनीला देण्यात आले होते. पण निविदा न काढता या कंपनीला संपूर्ण मुंबईचे काम देण्यात आल्यामुळे मरिन ड्राईव्हच्या रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर हे दिवे बसवण्यास शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला होता. पण आता पुन्हा निविदा न काढता येत्या ३१ मार्च २०१८ पूर्वी ३० हजार ४४५ दिवे बसवण्याचे टार्गेट दिले आहे.


सध्या मरिन ड्राईव्हवरील नेताजी सुभाष बोस (नरिमन पॉईंट ते तांबे चौक) मार्गावरील दिवाबत्तीच्या खांबावरील पारंपारिक सोडियम वेपरचे दिवे बदलून एलईडीच्या दिव्यांमध्ये  रुपांतर करण्यात आले आहे. शहर भागांतील रस्त्यांवर एकूण ३७ हजार ४५ दिवे बसवलेले आहेत. त्यातील ५ हजार ७०३ दिव्यांचे रुपांतर एलईडीमध्ये करण्यात आले आहे. पण ३१ मार्च २०१८ पर्यंत शहर भागात ११ हजार ४५ दिवे बसवण्याचे टार्गेट बेस्ट उपक्रमाला देण्यात आले आहे. तर रिलायन्सच्या ताब्यात ८७ हजार ३४७ दिवे आणि महावितरणच्या ताब्यात १२ हजार दिवे आहेत. संपूर्ण मुंबईत १ लाख ३६ हजार ३९२ दिवे असून त्यातील ३० हजार ४४५ दिवे हे ३१ मार्च २०१८ पर्यंत एलईडीमध्ये रुपांतरीत करण्याचे महापालिकेने संबंधित उपक्रमांना कळवले आहे.


महापालिकेवर अधिक आर्थिक बोजा

मुंबईच्या रस्त्यांवर ५० वॅट, १०५ वॅट, आणि १७० वॅट अशाप्रकारचे एलईडीचे दिवे बसवले जाणार आहे. मात्र सोडियम वेपरचे दिवे असताना महापालिकेला केवळ ८०० ते ९०० रुपये महिन्याला द्यावा लागायचा. पण एलईडीमुळे आता प्रति महिन्याला १०७० ते ११७५ रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे अधिक आर्थिक खर्चाचा बोजा महापालिकेला सोसावा लागणार आहे. पण यामुळे भविष्यात विद्युत उर्जेची बचत होऊन त्यावर होणाऱ्या खर्चात बचत होईल, असे महापालिकेच्या लेखा विभागाच्या अधिकऱ्यांचे म्हणणे आहे. जर यासाठी केंद्र अथवा राज्य सरकारने अनुदान दिल्यास देखभालीचा खर्च ८०० ते ८५० रुपयांवर येणार असून त्यामुळे महापालिकेवर आर्थिक बोजाही पडणार नाही, असेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांच म्हणणे आहे.


रस्त्यांवरील दिव्यांची संख्या

  • शहर भाग : ३७,०४५
  • पूर्व आणि पश्चिम उपनगर : ८७,३४७
  • कांजुरमार्ग, भांडुप-मुलुंड परिसर : १२,०००



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा