Advertisement

बोरिवली-ठाणे भुयारी मार्गासाठी ग्रंथालयावर हातोडा?

एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये पुस्तकांचे गाव उभे करण्याची घोषणा करण्यात आली असताना बोरिवली-ठाणे भुयारी मार्गासाठी या वाचनालयावर हातोडा पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बोरिवली-ठाणे भुयारी मार्गासाठी ग्रंथालयावर हातोडा?
SHARES

बहुप्रतीक्षित बोरिवली (borivali) - ठाणे (thane) भुयारी मार्गासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) निधी मंजूर केल्याने या मार्गाचे काम झपाट्याने मार्गी लागणार आहे.

या भुयारी मार्गासाठी संयुक्त महाराष्ट्र (maharashtra) चळवळीतील अग्रणी केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाचे ग्रंथालय आहे. हे 48 वर्षांपासून वाचकांची वाचनाची भूक भागवत आहे. 

मात्र या भुयारी मार्गामुळे या ग्रंथालयाचा बळी जाणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक समाजसेवक विजय वैद्य यांनी 1 मे 1977 रोजी बोरिवली (पूर्व) येथील जय महाराष्ट्र नगर येथे मागाठाणे मित्र मंडळ स्थापन केले आणि हे ग्रंथालय उभारण्यात आले.

या ग्रंथालयाला महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे. या ग्रंथालयाला (library) ब वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या ग्रंथालयात 30 हजार पुस्तकांचा ठेवा आहे.

या ग्रंथालयाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवा सेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापासून असंख्य मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.

नामांकित साहित्यिक शिवाजीराव भोसले यांच्यासह असंख्य साहित्यिकांची मांदियाळी या ग्रंथालयाने पाहिली आहे. याच ग्रंथालयाच्या विद्यमाने सर्वात पहिले मुंबई उपनगर मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आले होते.

एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये पुस्तकांचे गाव उभे करण्याची घोषणा करण्यात आली असताना बोरिवली-ठाणे भुयारी मार्गासाठी या वाचनालयावर हातोडा पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री आणि ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारे ॲड. आशिष शेलार हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

सरकार कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय, मातोश्री रमाबाई केशव ठाकरे बालवाडी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायामशाळेला याच जय महाराष्ट्र नगर परिसरात पर्यायी जागा उपलब्ध करून देणार का, याकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.

48 वर्ष जुने ग्रंथालय पाडून ते थेट चारकोप कांदिवली येथे हलविण्यात यावे अशी नोटीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मागाठाणे मित्र मंडळाला दिली आहे.

30 हजार पुस्तके वाऱ्यावर सोडून देण्यात येणार की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. हजारो वाचक या पुस्तकांसाठी, वाचनासाठी चारकोप कांदिवली येथे कसे जाणार? तसेच या हजारो वाचकांना पुस्तके वाचावयास कशी मिळणार, असे सवाल उपस्थित होत आहेत.



हेही वाचा

महाराष्ट्रातही कोल्ड्रिफ सिरपच्या विक्रीवर बंदी

मीरा-भाईंदर ते नायगाव मेट्रो प्रकल्पाच्या निविदेला विलंब

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा