Advertisement

मोठा दिलासा! राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध होणार शिथिल

राज्यातील २५ जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या बैठकीत घेण्यात आला आहे

मोठा दिलासा! राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध होणार शिथिल
SHARES

राज्यातील २५ जिल्ह्यातील कोरोना (coronavirus) निर्बंध शिथिल करण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमधील निर्बंध जैसे थेच राहणार आहेत. यासंदर्भातील माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना राजेश टोपे (rajesh tope) यांनी सांगितलं, राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असलेल्या २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर या जिल्ह्यातील दुकानं शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. दुकानं केवळ रविवारी बंद राहतील.

खासगी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यास अशा ठिकाणी ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा मिळेल. रेस्टॉरंट, सिनेमागृह, व्यायामशाळा यांना काही प्रमाणात निर्बंधांमधून सूट मिळू शकते. लग्न, राजकीय कार्यक्रमात गर्दी होऊ नये यासाठी निर्बंधांचा जीआर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर काढला जाईल, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचा- कोरोना निर्बंधांची आडकाठी फक्त महाराष्ट्रातच का?- राज ठाकरे

तर उरलेल्या ११ जिल्ह्यांमधील निर्बंध कायम राहणार आहेत. या जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यास किंवा परिस्थिती बिघडल्यास स्थानिक जिल्हा प्रशासन निर्बंध कडक करण्याचा निर्णय देखील घेऊ शकतात. त्यानुसार, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड आणि अहमदनगरमधील रहिवाशांना इतक्यात तरी निर्बंधांपासून सुटका मिळणार नाही. 

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांच्या मान्यतेनंतर येत्या १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा